तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे.जयललिता यांना सोमवारी कर्नाटक उच्च न्यायालयाने ६६.६५ कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी दोषमुक्त ठरवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे दूरध्वनीवरून अभिनंदन केले. गेल्या दोन दशकांपासून सुरू असलेल्या या बेहिशेबी मालमत्ताप्रकरण खटल्यातून भ्रष्टाचाराच्या सर्व आरोपातून सोमवारी जयललिता यांना मुक्त केले. जयललिता यांना दोषमुक्त ठरवल्यानंतर समर्थकांचा जल्लोष केला. तर, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दूरध्वनीकरून जयललितांचे अभिनंदन केले.
अर्थात यामागचा उद्देशही राजकीय असल्याची चर्चा आहे. भूसंपादन विधेयकासह इतर महत्त्वाच्या विधेयकांसाठी मोदी सरकारला संसदेत जयललितांच्या पक्षाचा पाठिंबा हवा आहे. तसेच यापूर्वी २०११ मध्ये जयललितांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथग्रहण सोहळ्याला मोदींनी आवर्जुन उपस्थिती लावली होती. तर त्याच्याच पुढच्या वर्षी नरेंद्र मोदींच्या शपथग्रहण कार्यक्रमाला जयललिता देखील हजर होत्या. इतकेच नव्हे तर, २०१३ साली नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदाच्या दावेदारीला पाठिंबा करणाऱ्या त्या पहिल्या मुख्यमंत्री होत्या. गेली दोन दशके हा खटला जयललितांच्या मागे लागला होता व त्यामुळे त्यांची कारकीर्द धोक्यात आली होती. जयललिता यांच्यासाठी हा मोठा कायदेशीर विजय मानला जात आहे. निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले की, जयललिता यांना आता पुन्हा विधानसभेची निवडणूक लढवावी लागेल. जयललिता यांचे वकील बी. कुमार यांनी सांगितले की, या निकालामुळे जयललिता आता पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात. जयललिता आणि त्यांचा पक्ष भ्रष्टाचाराच्या आरोपांमधून बाहेर येणे ही नरेंद्र मोदींसाठी एक खूप मोठी संधी आहे. राज्यसभेत एनडीएला संख्याबळासाठी पाठिंब्याची गरज आहे. त्यामुळे अण्णा द्रमुकचे ११ खासदार त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात. जयललितांच्या पक्षाचे लोकसभेत ३७ तर राज्यसभेत ११ खासदार आहेत.

Story img Loader