US Imposes Reciprocal Tariffs On India: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज देशभरातील अनेक देशांवर व्यापार कर लादण्याची घोषणा केली आहे. ज्या देशांवर अमेरिकेने व्यापार कर लादण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामध्ये भारतासारख्या मेत्रीपूर्ण संबंध असलेल्या देशासह चीनसारख्या कटू संबंध असलेल्या देशाचाही समावेश आहे.

ट्रम्प यांच्या घोषणेनंतर भारतातून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवर २६% व्यापार कर भरावा लागणार आहे. तर चीनच्या वस्तूंवर ३४% शुल्क आकारले जाईल. दरम्यान अमेरिकेने कंबोडियातून आयात होणाऱ्या वस्तूंवर सर्वाधिक ४९% व्यापार कर लागू करण्याची घोषणा केली आहे.

दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २६% व्यापार कर लागू केल्यानंतर काँग्रेससह विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकारला लक्ष्य केले आहे. यामध्ये शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांचाही समावेश आहे. सावंत यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना, “अमेरिकेने महान व्यक्तीची काय किंमत केली पाहा”, असे म्हटले आहे.

महान व्यक्तीची किंमत…

अमेरिकेने भारतावर २६% व्यापार कर लादल्यानंतर शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार अरविंद सावंत म्हणाले, “डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘महान व्यक्ती’ म्हटले की इकडे ढोल वाजवायला सुरुवात होते. अमेरिकेने ‘महान व्यक्ती’ची काय कमी केले आहे ते पहा. परराष्ट्र मंत्रीपदी जयशंकर यांच्यासारखी एक तज्ञ व्यक्ती असूनही, अमेरिका वारंवार आपली थट्टा करत आहे. युरोपातील छोटे छोटे देश पहा, ते स्वाभीमानाने अमेरिकेच्या विरोधात कशी भूमिका घेत आहेत.”

तुमचे पंतप्रधान महान

“पंतप्रधान मोदींनी नुकतेच अमेरिकेला भेट दिली. यावेळी आमच्यात खूप चांगल्या चर्चा झाल्या. आमचे कायमच मैत्रिपूर्ण संबंध राहिले आहेत. ते माझे चांगले मित्र आणि खूप हुशार व्यक्ती आहेत. तुमचे पंतप्रधान महान आहेत. पण भारत हा जगातील सर्वात जास्त कर आकारणारा देश आहे”, असे ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. आज खासदार अरविंद सावंत यांनी ट्रम्प यांच्या याच वाक्याचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

अमेरिकेने आता त्यांच्या वस्तूंवर इतर देश जितका कर आकारतात तितकाच कर त्यांच्या वस्तूंवर आकारण्याच्या निर्णय घेतला आहे. त्यामुळे अमेरिकेचे अनेक देशांबरोबर संबंध ताणले केले आहेत.