उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका धार्मिक कार्यक्रमात चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या घटनेत आतापर्यंत ८७ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश आहे. दरम्यान, या घटनेतील मृतकांच्या कुटुंबीयांना आता प्रत्येकी दोन लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा उत्तर प्रदेश सरकारने केली आहे. या घटनेनंतर पंतप्रधान मोदींनीही मृतकांना श्रद्धांजली वाहिली आहे. एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – मंदिराची तोडफोड करण्याचा मुस्लिम व्यक्तीवर आरोप; पण दर्ग्यात दडलं होतं सत्य, समोर आली…

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या घटनेबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली आहे. या घटनेतील पीडितांना शक्य ती सर्व मदत करण्यात येत आहे. या घटनेत ज्यांच्या मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. तसेच जे लोक जखमी झाले, ते लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना करतो, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी दिली.

उत्तर प्रदेश सरकारकडून आर्थिक मदत जाहीर

दरम्यान, या घटनेनंतर उत्तर प्रदेश सरकारने युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू केलं आहे. तसेच या घटनेच्या चौकशीसाठी एक उच्च स्तरीय समितीदेखील स्थापन करण्यात आली आहे. याशिवाय या घटनेतील मृतकांच्या कुटुबीयांना प्रत्येकी २ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा उत्तर प्रदेश सरकारकडून करण्यात आली आहे. तसेच जे लोक जखमी आहेत, त्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देणार असल्याचेही उत्तर प्रदेश सरकारने म्हटलं आहे.

नेमकी घटना काय?

द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशाच्या हाथरस येथील रतिभापूर गावात चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या गावात आज साकार विश्व हरी भोले बाबा यांचा संत्सग आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला जवळपास १५०० नागरीक उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने महिलांचा समावेश होता. या कार्यक्रमाला स्थानिक प्रशासनाने परवानगीदेखील दिली होती. दरम्यान, सत्संग सुरू चेंगराचेंगरीची घटना घडली. यात जवळपास ८७ जणांचा मृत्यू झाला.

हेही वाचा – “पंडित नेहरूंनी बाबासाहेब आंबेडकरांची राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी…”, पंतप्रधान मोदींचे काँग्रेसवर आरोप

योगी आदित्यनाथ यांनीही दिली प्रतिक्रिया

या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. हाथरस येथे घडलेली घटना दुर्दैवी आहे. या घटनेत ज्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. या ठिकाणी बचाव व मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. जखमींना उपचारकरिता रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

पुढे बोलताना, उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी आणि संदीप सिंह हे दोघेही घटनास्थळी जाण्यासाठी रवाना झाले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. याशिवाय ही घटना नेमकी कशी घडली, याची चौकशी करण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करणयात आल्याचेही त्यांनी सांगितले.