Tulsi Gabbard And Narendra Modi Gifts: अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड यांनी आज (सोमवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी गॅबार्ड यांना नुकत्याच संपन्न झालेल्या महाकुंभातील गंगाजल असलेली फुलदाणी भेट दिली. दुसरीकडे, गॅबार्ड यांनी पंतप्रधान मोदींना ‘तुळशी’ची माळ भेट दिली.

गॅबार्ड यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतल्यानंतर काही तासांतच त्यांची पंतप्रधान मोदींशी ही बैठक पार पडली. त्यांची चर्चा प्रामुख्याने बंदी घातलेल्या खलिस्तानी संघटने ‘सिख्स फॉर जस्टिस’ (एसएफजे) आणि त्यांच्या अमेरिकेत चालणाऱ्या भारतविरोधी कारवायांवर केंद्रित होती.

दिल्ली भेटीदरम्यान, गॅबार्ड यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत विविध विषयांवर भाष्य केले. डीप स्टेट मालमत्ता आणि भारतातील सत्ता बदलात अमेरिकन गुप्तचर एजंट्सच्या संभाव्य सहभागाबद्दल विचारले असता, गॅबार्ड म्हणाल्या की, त्यांच्या माहितीनुसार, याचे उत्तर नाही असे आहे.

भारत भेटीचा एक भाग म्हणून, गॅबार्ड यांनी द्विपक्षीय सुरक्षा सहकार्य मजबूत करण्याच्या उद्देशाने बैठका आणि परिषदांमध्ये भाग घेतला. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका परिषदेतही त्या सहभागी झाल्या होत्या. जिथे सुमारे २० देशांचे गुप्तचर आणि सुरक्षा अधिकारी एकत्र आले होते.

भारत-अमेरिकेसाठी चांगली संधी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर लादलेल्या टॅरिफच्या मुद्द्यावर भारत आणि अमेरिकेच्या उच्च नेतृत्व पातळीवर थेट चर्चा झाली आहे, असे अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड यांनी सोमवारी सांगितले. नवी दिल्लीतील थिंक टँक ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या वार्षिक रायसीना डायलॉग्सच्या वेळी बोलताना तुलसी गॅबार्ड म्हणाल्या की, “भारत आणि अमेरिकेतील आर्थिक संबंध मजबूत करण्यासाठी ही एक मोठी आणि चांगली संधी आहे.”

ट्रम्प आणि मोदी यांच्याकडून प्रयत्न

अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक असलेल्या तुलसी गॅबार्ड यांनी स्पष्ट केले की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी दोघेही टॅरिफच्या मुद्द्यावर चांगला उपाय शोधत आहेत. “मला एक मोठी सकारात्मक बाब वाटते, ती म्हणजे आपल्याकडे दोन नेते आहेत ज्यांच्याकडे कॉमन सेन्स आहे आणि ते चांगले उपाय शोधत आहेत. याबाबतची चर्चा थेट दोन्ही देशांच्या अगदी वरच्या पातळीवर होत आहे,” असेही गॅबार्ड म्हणाल्या.

Live Updates

Story img Loader