नवी दिल्ली : भारत आणि बांगलादेशमधील परस्पर विश्वासाला बाधा आणणाऱ्या अतिरेकी मूलतत्ववादी शक्तींचा एकत्र येऊन मुकाबला करू, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. भारताच्या दौऱ्यावर असलेल्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्यासोबत त्यांनी मंगळवारी द्विपक्षीय चर्चा केली. या भेटीमध्ये दोन्ही देशांमध्ये २५ वर्षांमधला पहिला जलवाटप करारही अस्तित्वात आला आहे.

पंतप्रधान मोदी आणि शेख हसिना यांच्या भेटीनंतर एकूण ७ करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये कुशियारा नदी जलवाटपाचा करार सर्वात महत्त्वाचा ठरला आहे. बांगलादेश आणि भारतामध्ये ५४ सामायिक नद्या आहेत.  कुशियारा पाणीवाटप करारामुळे दक्षिण आसाम आणि बांगलादेशातील सिल्हेत या भागांना फायदा होणार आहे.

बांगलादेश आणि पश्चिम बंगालमध्ये तिस्ता नदीच्या पाण्यावरून असलेला मोठा वाद सोडवण्याच्या दृष्टीने कुशियारा करार महत्त्वाचा मानला जात आहे. १९७१च्या बांगलादेश मुक्तीलढय़ात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांच्या वारसांना मुजिब शिष्यवृत्ती देण्याची घोषणा शेख हसिना यांनी केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे २०० शहिदांच्या वारसांना बुधवारी या शिष्यवृत्तीचे वितरण केले जाणार आहे.

अतिरेकी, मुलतत्ववाद्यांचा सामना करण्यासाठी परस्पर सहकार्याबाबत चर्चा झाली. १९७१पासूनचे संबंध कायम ठेवण्यासाठी, परस्पर विश्वासावर आघात करणाऱ्या अशा शक्तींचा एकत्र सामना करणे आवश्यक आहे.    –  नरेंद्र मोदी, पंतप्रधान

दोन्ही देशांनी सहकार्याच्या मार्गाने अनेक प्रश्न सोडवले आहेत. तिस्ता नदी पाणीवाटपासह अन्य  मुद्देही लवकरात लवकर निकाली निघतील.  – शेख हसिना, पंतप्रधान, बांगलादेश

Story img Loader