आपण सत्ता हाती घेतल्यापासून गेल्या दहा महिन्यांत भारतात विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. आपण जन गण मन अधिनायक असे म्हणतो. भारतामध्ये त्यापैकी ‘जन मन’ बदलले असल्याचे मोदींनी सांगितले. त्यांनी गुरूवारी टोरंटो येथे  हिंदी भाषेत १०,००० भारतीयांशी संवाद साधला.
८० कोटी तरूण लोकसंख्या, ८० कोटी स्वप्ने आणि १६० कोटी हात. मग आपल्याला जगात साध्य होणार नाही अशी कोणती गोष्ट आहे. भविष्यात मला भारतीय तरूणांना रोजगार शोधणाऱ्याच्या भूमिकेत नव्हे तर रोजगार निर्मात्यांच्या भूमिकेत पहायचे असल्याचे मोदी यांनी सांगितले.  तसेच यापूर्वीच्या राज्यकर्त्यांनी भारतामध्ये केलेला व्यवस्थेचा विचका आपण दूर करू, असे आश्वासनही त्यांनी उपस्थित भारतीयांनी दिले.
भारताला सध्या भेडसावत असणाऱ्या समस्यांवर विकास हेच एकमेव उत्तर आहे. त्यासाठी लागणारी सर्व क्षमता भारताकडे असून आता फक्त योग्य संधी मिळायला हवी, असे मोदींनी म्हटले. यावेळी नरेंद्र मोदींनी देशात यापूर्वी सत्तेत असलेल्या काँग्रेस सरकारलाही लक्ष्य केले. ज्यांना घाण करायची होती, ते घाण करून निघून गेले, आता आम्ही साफसफाई करू, असे सांगत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.
आगामी काळात भारत जागतिक विकासासाठी मनुष्यबळ पुरवेल. आमचे उद्दिष्ट ‘स्कॅम इंडिया’ नव्हे तर ‘स्किल इंडिया’ आहे. यावेळी उपस्थित असलेला जनसमुदाय मोठमोठ्याने मोदी-मोदी असा गजर करत होता. तेव्हा जे काही घडले आहे ते माझ्यामुळे नव्हे तर, भारतातील जनतेमुळे घडल्याचे मोदींनी सांगितले. यावेळी मोदींनी भारतातील तरूणाई देशाची सर्वात मोठी संपत्ती असल्याचे सांगितले. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi in canada 80 crore youth 160 crore strong hands what can we not achieve