पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ब्रिटन दौऱ्यात आरोपांचे खंडन
वाढत्या असहिष्णुतेबद्दलचा सूर भारतात तीव्र होत असताना आणि पंतप्रधान या नात्याने ब्रिटनच्या पहिल्याच दौऱ्यावर आल्यावर गुजरात दंगलींवरून लंडनमध्ये जाहीर निषेधाला तोंड द्यावे लागत असताना, एखाद-दोन घटना घडल्या असल्या तरी भारतात असहिष्णुतेला थारा नाही आणि कायद्यानुसार कठोर कारवाई होतेच, असे ठाम प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी संयुक्त पत्रकार परिषदेत केले.
ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्यासह झालेल्या या संयुक्त पत्रकार परिषदेत मोदी यांना २००२च्या दंगलीवरून थेट प्रश्न केला गेला तसेच त्यावेळी मोदी यांच्यावर बंदी घालणारे कॅमेरून यांनाच आता त्यांचे स्वागत करताना कसे वाटते, असा थेट प्रश्नही केला गेला तेव्हा या दोन्ही नेत्यांचे अवघडलेपण त्यांच्या देहबोलीतून जाणवले. या पत्रकार परिषदेत मोदी यांच्यासह आलेले दोन पत्रकार आणि बीबीसी वृत्तवाहिनी तसेच गार्डियन वृत्तपत्राचा प्रत्येकी एक प्रतिनिधी यांनी प्रश्न विचारले.
बीबीसीच्या प्रतिनिधीने भारतातील वाढत्या असहिष्णुतेवर बोट ठेवले तेव्हा मोदी उत्तरले की, भारत हा भगवान बुद्ध आणि महात्मा गांधी यांचा देश आहे आणि आमची संस्कृती मूलभूत सामाजिक मूल्यांना कदापि तडा जाऊ देत नाही. जरी अशा तऱ्हेच्या एक किंवा दोन वा तीन घटना घडल्या असल्या आणि सव्वाशे कोटींच्या देशात एखाद्या घटनेला कितीसे महत्त्व आहे, असे कुणाला वाटले तरी प्रत्येक घटना आमच्यासाठी तितकीच महत्त्वाची असते.
विशेष म्हणजे देशात असहिष्णुता आहे, हा केवळ विरोधकांच्या प्रचाराचा भाग असल्याचे वक्तव्य भाजप नेत्यांनी देशी माध्यमांसमोर केले होते. ते मोदी यांनी टाळले. अशा घटनांबाबत भारतात भाजपच्याच नेत्यांकडून झालेली बेजबाबदार वक्तव्ये आणि त्यावेळी मोदी यांनी बाळगलेले मौन याबाबतही मोदी काही बोलले नाहीत.
भारत हा लोकशाही देश असून प्रत्येक नागरिकाला संरक्षण आणि विचारस्वातंत्र्य आहे, असेही मोदी म्हणाले.
कॅमेरून यांच्या पंतप्रधानपदाच्या पहिल्या कारकिर्दीत मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांच्या ब्रिटन प्रवेशास बंदी घालण्यात कॅमेरून यांचाच पुढाकार होता. मग आता मोदी यांचे स्वागत करताना त्यांना कसे वाटते, असा प्रश्न गार्डियनच्या प्रतिनिधीने गुजरात दंगलींचा उल्लेख करीत विचारला. तसेच ब्रिटनमध्ये सध्या सुरू असलेल्या निदर्शनांबद्दल काय वाटते, असे त्याने मोदींनाही विचारले. त्यावर कॅमेरून म्हणाले की, भारताचे पंतप्रधान म्हणून मोदी यांचे स्वागत करताना मला आनंद वाटतो.
त्यांच्या पाठिशी ऐतिहासिक बहुमताचा आधार आहे. मागे जे काही घडले ते कायदेशीर प्रक्रियेनुसारच घडले आहे. आता आम्ही भविष्यावर नजर ठेवून एकत्र आलो आहोत. त्यासाठी आम्हाला देशवासियांच्या भक्कम पाठिंब्याचा आधार आहे. मोदी यांनी मात्र आपल्यावर ब्रिटनने कधीच बंदी घातली नव्हती, असा दावा केला. २००३मध्ये मी ब्रिटनला आलो होतो आणि माझे तेव्हा स्वागतच झाले होते, असेही ते म्हणाले.
त्यानंतर मात्र माझ्याच व्यस्त कार्यक्रमांमुळे मी येऊ शकलो नाही, असे ते म्हणाले. २००२च्या दंगली आणि त्यावरून सध्या लंडनमध्ये सुरू असलेल्या निदर्शनाबद्दल मात्र त्यांनी मौन बाळगले.
उभय देशांत ९ अब्ज पौंडाचे करार झाले आहेत. लंडनमध्ये रुपयांवर आधारित १ अब्ज पौंडाची बंधपत्रे जारी करण्यात येणार आहेत, असेही कॅमेरून यांनी सांगितले.
मोदी यांचे गुरुवारी सकाळी दहा वाजता हिथ्रो विमानतळावर आगमन झाले, तेव्हा परराष्ट्र राज्य मंत्री ह्युगो स्वायर व रोजगारमंत्री प्रीती पटेल यांनी त्यांचे स्वागत केले.
मोदी यांच्या समवेत टाटासन्सचे अध्यक्ष सायरस मिस्त्री, भारती एन्टरप्राइजेसचे सुनील भारती मित्तल, टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. चंद्रशेखरन उपस्थित होते. ब्रिटनच्या संसदेत तसेच उद्योजकांच्या मेळाव्यातही मोदी यांचे भाषण झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गांधी ते सावरकर..
वेम्ब्ले स्टेडियमवर ७० हजार अनिवासी भारतीयांनी ‘मोदी’घोषाने वातावरण भारून टाकले. कॅमेरून यांनी ‘अच्छे दिन जरूर आएंगे’, असे हिंदूीत नमूद करून मोदींचे स्वागत केले. मोदींनी भाषणात पार्लमेंटसमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. तसेच ब्रिटनमध्ये येऊन स्वातंत्र्यासाठी लढलेले शामजी कृष्ण वर्मा, स्वा. सावरकर, मदनलाल धिंग्रा यांचाही उल्लेख केला. देशातील विविधता, युवाशक्ती, परंपरा यांचा उल्लेख करतानाच ही संस्कृती जगभर नेणाऱ्या अनिवासी भारतीयांचे त्यांनी कौतुक केले.

पुढचे पाऊल.. भारत व ब्रिटन यांच्यात नागरी अणुकरार झाला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व भारताला मिळावे, यासाठी ब्रिटनने पाठिंबाही दिला आहे.

गांधी ते सावरकर..
वेम्ब्ले स्टेडियमवर ७० हजार अनिवासी भारतीयांनी ‘मोदी’घोषाने वातावरण भारून टाकले. कॅमेरून यांनी ‘अच्छे दिन जरूर आएंगे’, असे हिंदूीत नमूद करून मोदींचे स्वागत केले. मोदींनी भाषणात पार्लमेंटसमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. तसेच ब्रिटनमध्ये येऊन स्वातंत्र्यासाठी लढलेले शामजी कृष्ण वर्मा, स्वा. सावरकर, मदनलाल धिंग्रा यांचाही उल्लेख केला. देशातील विविधता, युवाशक्ती, परंपरा यांचा उल्लेख करतानाच ही संस्कृती जगभर नेणाऱ्या अनिवासी भारतीयांचे त्यांनी कौतुक केले.

पुढचे पाऊल.. भारत व ब्रिटन यांच्यात नागरी अणुकरार झाला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व भारताला मिळावे, यासाठी ब्रिटनने पाठिंबाही दिला आहे.