उच्चशिक्षण घेताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वास्तव्य केलेल्या लंडनमधील घराचा लोकार्पण सोहळा शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. या सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि आरपीआय नेते रामदास आठवले हेदेखील उपस्थित होते. या लोकार्पण सोहळ्यानंतर डॉ. आंबेडकरांचे घर सामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे.
राज्य सरकारने हे घर खरेदी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही प्रक्रिया बराच काळ रखडली होती. तब्बल आठ महिने रखडलेल्या या प्रक्रियेमुळे घर ताब्यात घेण्यासाठी घरमालकाने राज्य सरकारला शेवटची मुदतही दिली होती. त्यानंतर सरकारी पातळीवर हालचाली होऊन लवकरात लवकर ही प्रक्रिया पार पाडण्याचे आश्वासन घरमालकाला देण्यात आले होते. अखेर येत्या १२ सप्टेंबरला हा आंबेडकर निवासाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
भारतातून लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेत शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी याठिकाणी निवासाची व्यवस्था होऊ शकते का, यासाठी सध्या सरकारकडून चाचपणी सुरू असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  डॉ. आंबेडकर १९२१-२२ या कालावधीत शिक्षणासाठी लंडनला गेले होते. ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मधून त्यांनी त्यावेळी डी.एस.सी. ही पदवी संपादन केली. त्यावेळी बाबासाहेबांचे १० किंग हेन्री रोड, एनडब्ल्यू-३, लंडन या इमारतीत वास्तव्य होते.