देशभरात सोमवारपासून ज्या विधेयकाची चर्चा सुरू आहे ते महिला आरक्षण विधेयक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१९ सप्टेंबर) लोकसभेत मांडलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आपण सगळ्यांनी नवा इतिहास रचला आहे. असे काही क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात. आज असाच एक क्षण आला आहे. नव्या संसदेच्या पहिल्या सत्रातील पहिल्या भाषणात मी खूप विश्वास आणि गर्वाने सांगतोय की आजचा हा दिवस खूप खास आहे. आजच्या या दिवशी मी ‘नारी शक्ती बंधन अधिनियम’ (महिला आरक्षण विधेयक) लोकसभेच्या पटलावर मांडत आहे.
नरेंद्र मोदी म्हणाले, आज गणेश चतुर्थीचा दिवस आहे. गणपतीच्या आशीर्वादाने इतिहासात नोंद होईल असा हा आजचा दिवस आहे. आपल्या सर्वांसाठी हा क्षण खूप खास आहे. गेल्या अनेक वर्षांपासून देशात महिला आरक्षणाविषयी खूप चर्चा झाली, वादविवाद झाले. हे विधेयक पास करून कायदा बनवण्याचे अनेक प्रयत्न झाले. १९९६ मध्ये हे विधेयक पहिल्यांदा संसदेच्या पटलावर आलं. अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात अनेकदा हे विधेयक सादर करण्यात आलं. परंतु, ते पारित करून कायदा करण्यासाठी पुरेसं संख्याबळ त्यांच्याकडे नव्हतं. त्यामुळे आपलं स्वप्न अपूर्ण राहिलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, महिलांना अधिकार देण्याचं, त्यांच्या शक्तीचा उपोयोग करण्याचं काम मला मिळालं आहे. ईश्वराने मला अशा अनेक पवित्र कामांसाठी निवडलं आहे. पुन्हा एकदा आमच्या सरकारने त्या दिशेने पाऊल टाकलं आहे. महिला अक्षणाच्या विषयाला आमच्या कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. १९ सप्टेंबर या तारखेला इतिहासात अमरत्व प्राप्त होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, महिलांच्या नेतृत्वात देशाचा विकास (Women led Development) हा आमचा संकल्प आम्ही पुढे नेत आहोत. आमचं सरकार एक प्रमुख संविधान संशोधन विधेयक सादर करत आहे. लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांच्या भागीदारीचा विस्तार करणे, हे या विधेयकाचं लक्ष्य आहे. आम्ही आज ‘नारी शक्ती बंधन अधिनियम’ सादर करत आहोत. याच्या माध्यातून आपली लोकशाही अजून मजबूत होईल. मी देशातील माता, बहिणी आणि मुलींना नारी शक्ती बंधन अधिनियमासाठी शुभेच्छा देतो.
हे ही वचा >> भारताचं कॅनडाला जशास तसं प्रत्युत्तर, ‘त्या’ प्रकरणानंतर उच्चायुक्तांची हकालपट्टी, ५ दिवसांत देश सोडण्याचे आदेश
नरेंद्र मोदी म्हणाले, मी या सभागृहातील सर्व सदस्यांना आग्रहपूर्वक विनंती करतो की, सर्वानुमते हे विधेयक पास करा. या विधेयकाचं कायद्यात रुपांतर होईल तेव्हा त्याची ताकद अनेक पटींनी वाढेल. त्यामुळे मी सर्व खासदारांकडे प्रार्थना करेन की त्यांनी सर्वसंमतीने हे विधेयक पारित करावं.