लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी भाषण करताना शहिद जवानांचे फोटो मागे लावताना लाज वाटत नाही का? असा प्रश्न विचारत राज ठाकरे यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. पुलवामा येथे जे जवान शहीद झाले त्यानंतर बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करण्यात आला. मात्र नरेंद्र मोदी हे आता शहीद जवानांच्या नावे मतं मागत आहेत. एअर स्ट्राईक करणारे जवान काय निवडणुकीला उभे आहेत का? असा खोचक प्रश्न विचारत राज ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधला.
एका सभेत मोदी म्हणाले की माझ्या जीवाला धोका आहे तर दुसरीकडे मोदी म्हणाले देश माझ्या हातात सुरक्षित आहे.काय बोलताय एकदा म्हणता माझ्या जीवाला धोका आहे आणि दुसरीकडे म्हणत आहेत देश सुरक्षित आहे, नक्की काय खरं आहे? बरं हे बोलताना मागे फोटो शहीद जवानांचे फोटो लावलेत.लाज नाही वाटत?
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) April 12, 2019
या देशाने तुमच्यावर विश्वास दाखवला पण तुम्ही या देशाचा विश्वासघात केला असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे. नांदेडमध्ये आज राज ठाकरेंची प्रचारसभा पार पडली. या सभेत मोदींच्या भाषणांचे काही अंश सादर करत पुन्हा एकदा राज ठाकरेंनी मोदी आणि अमित शाह या दोघांविरोधात भूमिका घेतली. मी कुणाचाही प्रचार करायला आलेलो नाही माझ्या मनात जो राग आहे त्या रागातून मी जनतेसमोर आलो आहे असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोलण्यात काहीही ताळमेळ नाही याचे उदाहरण देताना राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मोदींच्या भाषणातील दोन अंश सादर केले. पहिल्या भाषणात मोदी म्हणत होते की नोटाबंदीनंतर माझ्या जिवाला धोका आहे आणि नंतर आता मोदी म्हणत आहेत तुमचा देश सुरक्षित हातांमध्ये आहे. मोदींना नेमकं म्हणायचं काय हेच कळत नाही ते स्वतःच संभ्रमात आहेत असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे. राज ठाकरे एकूण 8 ते 9 सभा घेणार आहेत. मोदी आणि अमित शाह यांना हटवा हीच माझी भूमिका आहे याचाही पुनरूच्चार आज राज ठाकरेंनी केला.