पंतप्रधान नरेंद्र मोदी विश्वाची निर्मिती करणाऱ्या ब्रह्मदेवासारखे आहेत. संसदेचे हिवाळी अधिवेशन कधी होणार? हे फक्त त्यांनाच ठाऊक आहे. अशी खोचक टीका काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. हिवाळी अधिवेशन लांबणीवर पडल्याची टीका सोमवारीच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली होती. त्यानंतर आज मल्लिकार्जुन खरगे यांनीही हाच मुद्दा पुढे करत पंतप्रधानांवर टीका केली आहे.
मोदी सरकारचा कार्यकाळ हा भारतीय लोकशाहीसाठी मोठा धक्का आहे, असाही आरोप खरगे यांनी केला. मी अनेक मंत्र्यांशी आणि नेत्यांशी बोललो. लोकसभा अध्यक्षांना विचारणा केली मात्र हिवाळी अधिवेशनाची तारीख अद्याप कोणालाही ठाऊक नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे जणू काही ब्रह्मदेवच आहेत तेच सांगू शकतात की हिवाळी अधिवेशनाची तारीख काय अशी खोचक टीका खरगे यांनी केली आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.
केंद्र सरकारला ‘मोदी सरकार’ असेच संबोधले जाते कारण सरकारमध्ये समावेश असलेल्या केंद्रीय मंत्र्यांना काहीही ठाऊक नाही. केंद्र सरकारच्या अनेक चुकीच्या निर्णयावर विरोधक धारेवर धरतील हे ठाऊक असल्यानेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिवाळी अधिवेशन लांबणीवर टाकले आहे. असाही आरोप खरगे यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी मनमानी करत आहेत असेही खरगेंनी म्हटले आहे. आम्ही तीव्र शब्दात सरकारचा निषेध नोंदवतो आहोत. लोकांच्या प्रश्नांसाठी संसद चालवणे गरजेचे आहे असेही खरगे यांनी स्पष्ट केले.
गुजरात आणि हिमाचल निवडणुका समोर आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी हिवाळी अधिवेशन पुढे ढकलत आहेत. मात्र गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा खरा चेहरा उघडा पडणार आहे. या सरकारला नोटाबंदीचे परिणाम आणि जीएसटीची फसलेली अंमलबजावणी यावर काहीही चर्चा करायची नाही म्हणूनच हिवाळी अधिवेशन लांबवले जाते आहे असाही आरोप खरगे यांनी केला.
सोमवारी सोनिया गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये संसदेला सामोरे जाण्याची हिंमत नसल्याचा आरोप केला होता. ज्या आरोपाला केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी उत्तर देत काँग्रेसवर टीका केली होती. आता मल्लिकार्जुन खरगे यांच्या खोचक टीकेमुळेही भाजप आणि काँग्रेस यांच्यात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.