PM Modi Mann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. ते म्हणाले, “आज जेव्हा मी तुमच्याशी बोलत आहे, तेव्हा मला खूप वेदना होत आहेत. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी घटनेने देशातील प्रत्येक नागरिकाला दुःख झाले आहे. प्रत्येक भारतीयाला पीडित कुटुंबांबद्दल सहानुभूती आहे. तो कोणत्याही राज्यातील असो, कोणतीही भाषा बोलणारा असो, या हल्ल्यात ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्या वेदना मला जाणवत आहेत.”
दहशतवाद्यांना आणि त्यांच्या सूत्रधारांना…
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “दहशतवाद्यांना आणि त्यांच्या सूत्रधारांना काश्मीर पुन्हा उद्ध्वस्त करायचे आहे आणि म्हणूनच त्यांनी एवढा मोठा कट रचला. दहशतवादाविरुद्धच्या या युद्धात देशाची एकता, १४० कोटी भारतीयांची एकता ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. ही एकता दहशतवादाविरुद्धच्या आपल्या निर्णायक लढाईचा आधार आहे.”
एक राष्ट्र म्हणून आपल्याला…
पंतप्रधान पुढे म्हणाले, “देशासमोरील या आव्हानाला तोंड देण्यासाठी आपल्याला आपला संकल्प मजबूत करावा लागेल. एक राष्ट्र म्हणून आपल्याला प्रबळ इच्छाशक्ती दाखवावी लागेल. आज जग पाहत आहे, या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश एकजूट झाला आहे.”
दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांची निराशा
पंतप्रधान मोदी म्हणाले, “पहलगाममधील हा हल्ला दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांची निराशा आणि त्यांचा भ्याडपणा दर्शवितो. काश्मीरमध्ये शांतता परतत होती, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये चैतन्य होते, विकास कामांना गती मिळाली होती, लोकशाही मजबूत होत होती, पर्यटकांच्या संख्येत विक्रमी वाढ होत होती, लोकांचे उत्पन्न वाढत होते, तरुणांसाठी नवीन संधी निर्माण होत होत्या. हे देशाच्या शत्रूंना, जम्मू-काश्मीरच्या शत्रूंना आवडले नाही.”
दहशतवादाविरुद्धच्या लढाईत संपूर्ण जग…
“भारतीय लोकांमध्ये जो राग आहे तो जगभर आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे. जागतिक नेत्यांनीही मला फोन केले आहेत, पत्रे लिहिली आहेत आणि संदेशही पाठवले आहेत. या भयानक दहशतवादी हल्ल्याचा सर्वांनी तीव्र निषेध केला आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला आहे. दहशतवादाविरुद्धच्या आपल्या लढाईत संपूर्ण जग १४० कोटी भारतीयांसोबत उभे आहे. मी पुन्हा एकदा पीडित कुटुंबांना आश्वासन देतो की, त्यांना न्याय मिळेल, न्याय नक्कीच मिळेल. या हल्ल्यातील गुन्हेगारांना आणि कट रचणाऱ्यांना कठोर प्रत्युत्तर दिले जाईल”, असेही पंतप्रधान मोदी मन की बात कार्यक्रमात बोलताना म्हणाले.