भारतीय संघाचा फलंदाज गौतम गंभीरने ४ डिझेंबर रोजी क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली होती. सोशल मीडियावर व्हिडिओ संदेश देऊन त्याने निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर त्याने ६ डिसेंबर रोजी आंध्र प्रदेशविरूद्धच्या फिरोजशाह कोटला मैदानावरील अखेरच्या सामन्यात शानदार शतक झळकावून धमाकेदार अंदाजात क्रिकेटला निरोप दिला. निवृत्तीनंतर गंभीर राजकारणातून आपली दुसरी इनिंग सुरु करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तो भाजपात जाईल असा अंदाज वर्तवण्यात येत असला तरी त्याने मात्र यावर आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रिकेटमध्ये महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या या खेळाडूला पत्र लिहून त्याचे आभार मानले आहेत.

निवृत्त होणं म्हणजे एखाद्या गोष्टीचा अंत नसून ती अनेक नव्या गोष्टींची सुरुवात आहे, असे म्हणत मोदींनी त्याच्या सोनेरी कारकीर्दीचे स्मरण करत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. क्रिकेटमध्ये दिलेले योगदान आणि सामाजिक कार्यातील पुढाकाराचे मोदींनी आपल्या पत्रात कौतुक केले आहे. गंभीरने हे पत्र सोशल मीडियावर शेअर करत त्यांचे आभार मानले आहेत. गंभीरने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तुमच्या प्रेमळ शब्दांसाठी धन्यवाद. चाहते आणि देशवासियांचे प्रेम आणि सहकार्याशिवाय हे मला शक्य झाले नसते. माझे सर्व यश देशाला समर्पित आहे.