PM Modi Lex Fridman Podcast : रशिया आणि युक्रेनमध्ये जवळपास दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून संघर्ष सुरु आहे. रशिया सातत्याने युक्रेनवर हल्ले करत आहे, यात युक्रेनची अनेक शहरे उद्ध्वस्त होत आहेत. युक्रेन-रशियातील हा संघर्ष थांबण्यासाठी काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे देखील मध्यस्थी करत असल्याचं पाहायला मिळालं. डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धबंदी प्रस्तावावर व्लादिमीर पुतिन हे देखील सहमत असल्याचं समोर आलं. मात्र, युद्धबंदी प्रस्तावानंतर युक्रेनसाठी काही अटी शर्थींची मागणी व्लादिमीर पुतिन यांनी केली. त्यावर युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी पुन्हा टीका केली होती.
दरम्यान, आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया आणि युक्रेनच्या संघर्षावर मोठं भाष्य केलं आहे, तसेच रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांना एक मोलाचा सल्लाही दिला आहे. अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरचा पॉडकास्ट आज (१६ मार्च) प्रसारित झाला. या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल तीन तास संवाद साधला. या संवादात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी नरेंद्र मोदींना युक्रेन आणि रशियातील युद्धाबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ‘ही वेळ युद्धाची नाही’, असं म्हणत मोदींनी पुतिन आणि झेलेन्स्की यांना सल्ला दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?
“रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश मित्र राष्ट्र आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबरोबर बसून मी त्यांना म्हणू शकतो की ही युद्धाची वेळ नाही. तसेच युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनाही मी मैत्रीपूर्ण पद्धतीने सांगू शकतो की भाऊ, जगात कितीही लोक तुमच्याबरोबर उभे असले तरी युद्धभूमीवर कधीही तोडगा निघणार नाही”, असं म्हणत रशिया आणि युक्रेन संघर्ष केवळ चर्चेनेच संपेल हे भारताने अनेक वेळा स्पष्ट केलं असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.
“युक्रेन मित्र राष्ट्रांसोबत असंख्य वेळा चर्चा करू शकेल. मात्र, त्याचे कोणतेही फळ मिळणार नाही. चर्चांमध्ये दोन्ही देशांचा समावेश असला पाहिजे. यावर तोडगा फक्त वाटाघाटींच्या माध्यमातून काढता येईल, युद्धभूमीवर नाही. युद्धामुळे संपूर्ण जगाला त्रास सहन करावा लागला आहे. मी यामध्ये कुठेही तटस्थ नाही, तर मी शांततेच्या बाजूने आहे”, असंही मोदींनी म्हटलं आहे.
पाकिस्तानबाबत मोदींनी काय म्हटलं?
“भारताने शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र, आम्हाला प्रत्येकवेळी शत्रुत्व आणि विश्वासघाताचा सामना करावा लागला”, असं स्पष्ट करत पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानशी संबंध सुधारण्याच्या आपल्या प्रयत्नांचा उल्लेख केला. तसेच जागतिक स्तरावर शांततेसाठी भारताची वचनबद्धता कायम असल्याचं अधोरेखित केलं.
पंतप्रधान मोदींनी २०१४ मधील एका घटनेचाही उल्लेख केला. मोदींनी म्हटलं की, “२०१४ मध्ये शपथविधी सोहळ्यासाठी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना आमंत्रित केलं होतं. आशा होती की ते भारत-पाकिस्तान संबंधांसाठी एक नवीन सुरुवात करू शकतील. पण तसं झालं नाही. दरम्यान, पाकिस्तानचे लोकही हिंसाचार, अशांतता आणि दहशतीला कंटाळले असून त्यांनाही शांतता हवी आहे”, असं मोदींनी म्हटलं.