पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे दिसणारे अभिनंदन पाठक लखनऊमधील सरोजिनी नगर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत. ५६ वर्षीय अभिनंदन पाठक हे सहारनपूरचे रहिवासी आहेत. अपक्ष म्हणून निवडणूक लढण्यापूर्वी त्यांनी भाजपाकडे तिकीटही मागितले होते, मात्र त्यांना पक्षाकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही.

तिकिटाच्या मागणीबाबत पाठक म्हणाले की, “मी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पत्राद्वारे तिकिटाची मागणी केली होती. पण त्यांनी माझ्या पत्राकडे लक्ष दिले नाही. स्वत:ला मोदीभक्त असल्याचे सांगून ते म्हणाले की, भाजपा माझ्याकडे दुर्लक्ष करू शकते, पण मी निवडणूक नक्कीच लढवणार आहे.”

अभिनंदन पाठक यांना आपण निवडणूक जिंकू असा विश्वास व्यक्त केला. योगी आदित्यनाथ पुन्हा युपीचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी त्यांची इच्छा आहे. पीएम मोदी आणि सीएम योगी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मी त्यांच्या कामाची प्रशंसा करतो. ते जनतेसाठी निस्वार्थपणे काम करत आहेत, असं पाठक म्हणाले.

पाठक सांगतात की, यापूर्वीही त्यांनी भाजपाकडे तिकीट मागितले होते, मात्र पक्षाने त्यांची मागणी फेटाळून लावली होती. त्यांचं म्हणणं आहे की, यापूर्वी छत्तीसगड विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपाला मदत करण्यासाठी ते राज्यात फिरले होते. तत्कालीन मुख्यमंत्री रमण सिंह यांनी त्यांना गांभिर्याने घेतले नाही आणि त्यांची खिल्ली उडवली होती, असा आरोप पाठक यांनी केला आहे.

पाठक यांच्या आरोपानुसार, छत्तीसगड भाजपाने त्यांना यात्रेदरम्यान राहण्यासाठी जागाही दिली नाही. पाठक यांची पत्नी मीरा पाठक यांनी आर्थिक पाठबळ नसल्यामुळे घटस्फोटासाठी अर्ज केला होता. घटस्फोटानंतर पाठक आपल्या उदरनिर्वाहासाठी ट्रेनमध्ये काकडी विकतात. पाठक यांना तीन मुलींसह एकूण ६ मुले आहेत. त्यांनी सांगितले, की “जेव्हापासून मी आर्थिक संकटानंतर घर सोडले तेव्हापासून माझ्या पत्नीने माझ्याशी संपर्क साधला नाही. मला राजकारणी बनून समाजाची सेवा करायची आहे,” असंही ते म्हणाले.

Story img Loader