PM Modi Meets Translators Of Mahabharata And Ramayana : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी कुवेतला भेट देणारे ४३ वर्षांतील पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. या दौऱ्यादरम्यान पतंप्रधान मोदी यांनी महाभारत आणि रामायण या महाकाव्यांचे अरबी भाषेत भाषांतर आणि प्रकाशन करणाऱ्या अब्दुल्ला अल-बरौन आणि अब्दुल लतीफ अल-नेसेफ या कुवेती नागरिकांची भेट घेतली.

शनिवारी मोदींचे कुवेतमध्ये आगमन झाले, तेथे कुवेतमधील भारतीय नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांच्या निमंत्रणावरून ते कुवेत दौऱ्यावर गेले आहेत. यापूर्वी १९८१ मध्ये इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान असताना कुवेतला भेट दिली होती.

भारतीय संस्कृतीची जगभरात लोकप्रियता

महाभारत आणि रामायणाच्या भाषांतरकारांची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर यायाबत अरबी भाषेत पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले की, “रामायण आणि महाभारताचे अरबी भाषांतर पाहून मला आनंद झाला. अब्दुल्ला अल-बॅरन आणि अब्दुल लतीफ अल-निस्फ यांनी महाभारत आणि रामायणाचा अनुवाद आणि प्रकाशन केल्याबद्द मला त्यांचे कौतुक वाटत आहे. त्यांचा हा उपक्रम भारतीय संस्कृतीची जगभरात लोकप्रियता अधोरेखित करतो.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी कुवेतमधील शेख साद अल-अब्दुल्ला इनडोअर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ‘हला मोदी’ या विशेष कार्यक्रमात कुवेतमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांच्या मेळाव्याला उपस्थिती लावली होती. यावेळी कुवेतमध्ये असलेल्या भारतीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. या मेळाव्यात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “भारत आणि कुवेतमधील संबंध इथे असलेल्या भारतीयांनी समृद्ध केले आहेत, जे दोन्ही राष्ट्रांमधील संबंध दृढ करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. कुवेतच्या महामहिम अमिरांनी आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे आभार. जुनी मैत्री भक्कम आणि घट्ट करण्यासाठी ४३ वर्षांनी भारतीय पंतप्रधान कुवेतला भेट देत आहे.”

हे ही वाचा : “चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू झाल्यानंतर, अभिनेता म्हणाला चित्रपट हिट होईल”, नाव न घेता ओवैसींचा अल्लू अर्जुनवर आरोप

भारतीय कामकारांची भेट

या कुवेत दौऱ्यावर पोहचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात प्रथम १५०० भारतीय नागरिक राहत असलेल्या मिना अब्दुल्ला भागातील कामगार वस्तीला भेट दिली. पंतप्रधानांनी भारतातील विविध राज्यांतील कामगारांशी संवाद साधला.

गेल्या काही वर्षांत, सरकारने परदेशातील भारतीय कामगारांच्या कल्याणासाठी ई-माइग्रेट पोर्टल, MADAD पोर्टल आणि श्रेणीसुधारित प्रवासी भारतीय विमा योजना यासारखे तंत्रज्ञानावर आधारित अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.

Story img Loader