विकसनशील देशांच्या भक्कमपणे पाठीशी – मोदी; फ्रान्स दौऱ्यात द्वीपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी भेटीगाठी | pm modi meeting to boost bilateral engagement during france tour zws 70
पॅरिस :जगभरातील विकसनशील देशांचा ‘नेता’ म्हणून भारत स्वत:कडे पाहत नाही. उलट या देशांचे सामुहिक नेतृत्व उदयाला यावे, असे आमचे मत असून त्यासाठी भारत या देशांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्यांचा दोन दिवसांचा फ्रान्स दौरा गुरूवारपासून सुरू झाला. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी ‘ले इको’ या अग्रणी फ्रेंच दैनिकाला मुलाखत दिली.
पॅरीस विमानतळावर स्वागत झाल्यानंतर फ्रान्स दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बॉर्न, सेनेटचे अध्यक्ष गेरार्ड लार्चर यांची भेट घेतली. भारत आणि फ्रान्समधील गेल्या २५ वर्षांचे संबंध अधिक दृढ करण्याच्या आणि विस्तारण्याच्या दृष्टीने दोन्ही नेत्यांशी चर्चा केली. तत्पुर्वी ‘ले इको’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या मुद्दय़ांवर भाष्य केले. बहुविविधतेमध्येही सौहार्दाने राहता येते हे भारतासारख्या जगातील सर्वात मोठय़ा लोकशाहीने जगाला दाखवून दिले आहे. भारताची युवाशक्ती हे देशाचे बलस्थान असल्याचे मोदी यांनी सांगितले. भारतासारख्या देशाला आंतरराष्ट्रीय व्यवस्था आणि संस्थेमध्ये स्वत:ला लवचिकपणे जुळवून घेता येते, त्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताला कायमस्वरूपी स्थान मिळायलाच हवे असे आग्रही प्रतिपादन मोदी यांनी केले. यासाठी फ्रान्सचा भारताला पािठबा असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. आपण पंतप्रधान झाल्यानंतर फ्रान्सबरोबरच्या धोरणात्मक भागीदारीवर विशेष भर दिला आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या विकसनशिल देशांवर होत असलेल्या परिणामामुळे अतिशय चिंतित असून हा संघर्ष संपला पाहिजे अशी भूमिका मोदी यांनी मांडली. आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये विकसनशिल देशांना सहभागी करून घेतले जात नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. भारत आणि फ्रान्सदरम्यानच्या संबंधाबरोबरच भारत-अमेरिका संबंध, चीनचा सीमावाद, संयुक्त राष्ट्रांची रचना अशा अनेक मुद्दय़ांवर मोदी यांनी मतप्रदर्शन केले. एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये ते म्हणाले की, भारताने नेहमीच संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून आणि अन्य देशांच्या स्वायत्ततेचा आदर ठेवून शांततापूर्ण पद्धतीने प्रश्न सोडवण्यावर भर दिला आहे.
चीनविषयी परखड मत
चीनच्या संरक्षण क्षेत्रातील आक्रमक गुंतवणूक धोरणाविषयी मोदी यांना या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, की भारताले जे भविष्य घडवायचे आहे त्यासाठी शांतता महत्त्वाची आहे. मात्र अद्याप अशा शांततेती हमी मिळालेली नाही. हिंदू-प्रशांत प्रदेशातील सर्वाना सुरक्षितता आणि विकास हा आपला दृष्टीकोन आहे. भारत आंतरराष्ट्रीय कायदे आणि नियमाधारित आंतरराष्ट्रीय सुव्यवस्था यासाठी आग्रही आहे. परस्पर विश्वास कायम राखण्यासाठी हे धोरण अधिक महत्त्वाचे आहे, असे मोदी यांनी नमूद केले.