पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी ताश्कंदमध्ये चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी याठिकाणी दोन दिवसीय शांघाय सहकार्य परिषदेसाठी (एससीओ) दाखल झाले आहेत. मोदी आणि जिनपिंग यांच्या भेटीत भारताच्या एनएसजी सदस्यत्वासंबंधी चर्चा झाल्याची शक्यता आहे. अण्वस्त्र पुरवठादार गटात सदस्यत्व मिळण्याचा भारत प्रयत्न करीत असून चीनने त्यामध्ये अडसर निर्माण केला आहे त्यामुळे चीनने भारताच्या या प्रयत्नाला पाठिंबा द्यावा, अशी मागणी मोदी या भेटीच्या वेळी जिनपिंग यांच्याकडे करणार असल्याची चर्चा होती. या परिषदेत मोदींची शिष्टाई फळाला येणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, अणु साहित्य पुरवठादार गटाचे सदस्यत्व भारताला मिळवून देण्यासाठी प्रयत्नांचा भाग म्हणून परराष्ट्र सचिव एस. जयशंकर हे एनएसजी बैठकीसाठी दक्षिण कोरियातील सोलला रवाना झाले आहेत. भारताला सदस्यत्व मिळू नये यासाठी चीनचे प्रयत्न सुरू आहेत. ४८ देशांची बैठक सोमवारपासून सुरू झाली असून आता ती अंतिम टप्प्यात असताना जयशंकर तिकडे रवाना झाले आहेत. भारताला एनएसजी सदस्यत्व मिळावे यासाठी विविध देशांचे मन वळण्याच्या प्रयत्न ते करतील. परराष्ट्र मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी अमनदीप सिंग गिल हे अगोदरच सोलमध्ये असून ते भारताची बाजू मांडत आहेत. चीनने भारत एनपीटी कराराचा स्वाक्षरीदार नसल्याने पुन्हा एकदा विरोध सुरूच ठेवला आहे. एका देशाने जरी भारताविरोधात मत दिले तरी हे सदस्यत्व भारताला मिळू शकणार नाही. काही प्रतिष्ठित देशांचा भारताला पाठिंबा असला तरी चीनचा मात्र विरोध आहे. त्याचबरोबर तुर्कस्थान, दक्षिण आफ्रिका, आर्यलड व न्यूझीलंड भारताच्या बाजूने नाहीत. भारताला जर एनपीटी करार स्वाक्षरीच्या अटीतून सूट मिळणार असेल तर पाकिस्तानलाही मिळाली पाहिजे असे चीनने म्हटले आहे.
Uzbekistan: PM @narendramodi and President Xi Jinping meet. pic.twitter.com/cxj9JfD0z5
— PMO India (@PMOIndia) June 23, 2016