पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळामधील पहिला मंत्रीमंडळ विस्तार बुधवारी पार पडला. या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये ४३ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यात, ३६ नव्या मंत्र्यांचा समावेश असून, १५ कॅबिनेट मंत्री, तर २८ राज्यमंत्री आहेत. नव्या रचनेत मोदींच्या मंत्रिमंडळात आता ७७ मंत्री आहेत. त्यातील ७३ भाजप व उर्वरित ४ मंत्री अपना दल, जनता दल (सं), लोक जनशक्ती व रिपब्लिकन पक्ष या घटक पक्षांचे आहेत. मोदींचे नवे मंत्रिमंडळ पूर्वीच्या तुलनेत अधिक तरुण असून महिला, ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती, जाट, मराठा समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उत्तर प्रदेशला सर्वाधिक ७ तर, महाराष्ट्राला ४ नवी मंत्रिपदे देण्यात आली आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात २५ राज्यांना प्रतिनिधित्व मिळाले आहे. मात्र असं असतानाच नव्याने संधी देण्यात आलेल्या खासदारांमध्ये पक्ष बदल करुन आलेल्या खासदारांचा भरणा अधिक असल्याचं चित्र दिसत आहे.

महाराष्ट्रामधून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड आणि डॉ. भारती पवार यांना स्थान मिळाले आहे. मात्र यापैकी भागवत कराड वगळता इतर तिन्ही खासदार हे पूर्ण काँग्रेस किंवा राष्ट्रवादीमध्ये होते. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आलेले नारायण राणे हे पूर्वी शिवसेना आणि काँग्रेसमध्ये होते. तसेच आरोग्य मंत्रालयातील राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आलेल्या डॉ. भारती पवार या सुद्धा २०१९ पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत्या. त्याचप्रमाणे पंचायत राज राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलेले कपिल पाटीलही २०१४ पर्यंत राष्ट्रवादीमध्ये होते. त्यामुळेच अर्थराज्यमंत्री भागवत कराड वगळता राज्यातून मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेले सर्व नवीन मंत्री हे अन्य पक्षातून भाजपावासी झालेले नेते आहेत.

नक्की पाहा >> PM Modi Cabinet : मोदींच्या मंत्रिमंडळातून ‘हे’मंत्री OUT; राज्यातील दोन मंत्र्यांचाही समावेश

राज्यच नाही तर नव्याने समावेश करुन घेण्यात आलेल्या मंत्र्यांपैकी अनेकजण हे इतर पक्षामधून भाजपामध्ये आलेले नेते आहेत. या यादीमध्ये प्रामुख्याने नावं घ्यावं लागेल ते म्हणजे ज्योतिरादित्य शिंदे. दीड वर्षांपूर्वी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या मध्य प्रदेशमधील या मोठ्या नेत्याला मंत्रिपदासाठी एक वर्ष ताटकळत ठेवल्यानंतर अखेर मंत्रिमंडळात संधी देण्यात आलीय. याशिवाय उत्तर प्रदेशमधील स्तयपालसिंह बघेल यांनाही मंत्रिमंडळात संधी देण्यात आलीय. सत्यपालसिंह बघेल हे भाजपामध्ये येण्याआधी समाजवादी पार्टी आणि बहुजन समावादी पार्टीमध्ये होते. झारखंडच्या अन्नपूर्णा देवींनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं असलं तरी पूर्वी त्या राष्ट्रीय जनता दलात होत्या. पश्चिम बंगालमधील तृणमूलचे माजी नेते निशिथ प्रामाणिक यांनाही भाजपामध्ये आल्यानंतर मंत्रिपदाची संधी देण्यात आलीय.

मात्र अगदी काही वर्षांपूर्वी बाहेरुन आलेल्या नेत्यांना संधी दिल्याने निष्ठावंताना डावलल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागली आहे. मात्र त्याचवेळी दुसरीकडे ज्योतिरादित्य शिंदेंसारख्या नेत्यांना महत्वाचं मंत्रीपद देत भाजपामध्ये बाहेररुन येणाऱ्या नेत्यांना योग्य सन्मान आणि मान दिला जातो असा संदेश पक्षांतर करण्यासाठी इच्छूक असणाऱ्यांना भाजपाने या मंत्रीमंडळ विस्ताराच्या माध्यमातून दिल्याचीही चर्चा आहे.

Story img Loader