गेल्या अनेक दिवसांपासून बहुप्रतिक्षित असलेला केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज झाला असून यामध्ये महाराष्ट्रातल्या चार खासदारांचा समावेश झाला आहे. यामध्ये भाजपाचे राज्यसभेतले खासदार नारायण राणे, खासदार कपिल पाटील, खासदार भागवत कराड आणि भारती पवार यांचा समावेश आहे. नारायण राणे यांची मोठी राजकीय कारकिर्द राहिली आहे. त्यासोबतच कपिल पाटील यांनी देखील मोठी राजकीय कारकिर्ज आणि देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून आपलं स्थान भक्कम केलं आहे. मात्र, भारती पवार हे उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणातलं महत्त्वाचं नाव म्हणून मानलं जातं. विशेषत: ग्रामीण महाराष्ट्रात त्यांचा चांगला जम बसला असल्यामुळेच अवघ्या दोन वर्षांत त्यांच्या गळ्यात थेट केंद्रीय मंत्रीपदाची माळ पडली आहे!
राष्ट्रवादीपासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात!
भारती पवार यांचा जन्म १३ सप्टेंबर १९७८ला झाला. पेशानं डॉक्टर असलेल्या भारती पवार या नाशिकमधल्या दिंडोरी मतदारसंघातल्या खासदार आहेत. २००२ साली म्हणजेच जवळपास १९ वर्षांपूर्वी त्यांनी एमबीबीएसची पदवी प्राप्त केली. पण त्यांचा राजकारणाशी खरा संबंध आला तो लग्नानंतर. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेले माजी आमदार ए. टी. पवार यांच्या त्या स्नुषा आहेत. नाशिक जिल्हा परिषदेच्या देवळा गटातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
ग्रामीण भागात दांडगा जनसंपर्क!
भारती पवार या राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा होत्या. भारती पवार यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांपासून कार्यकर्त्यांचं मोठं जाळं विणलं. त्यांचा ग्रामीण भागात दांडगा जनसंपर्क आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार असताना त्यांनी लाखोंच्या घरात मतं मिळवली होती.
नारायण राणे यांच्यासह महाराष्ट्रातील चौघांचा मंत्रिमंडळात समावेश; मंत्र्यांची यादी जाहीर
२०१९मध्ये भाजपा प्रवेश
दरम्यान, भारती पवार यांचा कौटुंबिक पार्श्वभूमी असून देखील राष्ट्रवादीसोबत ताळमेळ बसला नाही. गृहकलहामुळे आणि राष्ट्रवादीत दुय्यम वागणूक मिळत असल्याने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपात प्रवेश केला. २०१९ ला दिंडोरी मतदारसंघातून त्या भाजपाकडून खासदार म्हणून निवडून आल्या. स्वत:ची यंत्रणा आणि आता सत्ताधारी भाजपाची ताकद मिळाल्याने दिंडोरीत त्यांची ताकद वाढली आहे. भारती पवारांच्या निमित्ताने भाजपाने उत्तर महाराष्ट्रातील एक मोठं घराणं गळाला लावल्याचं बोललं जातंय. मात्र, त्यासोबतच भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या २ वर्षांत भारती पवार यांना केंद्रीय मंत्रीपद मिळाल्यामुळे त्यांच्यासाठी ही मोठी झेप मानली जात आहे.