काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी सध्या ‘सत्य का सफर: राहुल गांधी के साथ’ या व्हिडीओ सीरीजच्या माध्यमातून देशसमोरील प्रश्नांना वाचा फोडत आहेत. या सीरीजमधील तिसऱ्या व्हिडीओच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत:ची प्रतिमा बनवण्यावर १०० टक्के लक्ष केंद्रीत केले आहे. भारतातल्या ताब्यात घेतलेल्या संस्था तेच काम करण्यामध्ये व्यस्त आहेत. एका माणसाची प्रतिमा राष्ट्रीय दृष्टीकोनाला पर्याय असू शकत नाही” असे राहुल गांधी यांनी टि्वट केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. दोन मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये राहुल गांधी यांनी भारत-चीन संबंधांबद्दलही भाष्य केले आहे.

“तुम्ही बळकट स्थितीमध्ये राहून चीनशी चर्चा करत असाल, तरच तुम्ही त्यांच्याशी चर्चा करु शकता. चीनने जर तुमचा कमकुवतपणा पकडला, तर अडचण आहे. चीनचा विषय हाताळण्यासाठी तुमच्याकडे दृष्टीकोन असला पाहिजे. भारताला जागतिक दृष्टीकोनाची गरज आहे” असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

मोठा आणि दीर्घकालीन विचार न केल्यामुळे आपण एक संधी गमावू शकतो असे राहुल गांधी म्हणाले. “आपण आपसातच लढत आहोत, राजकारणाकडे बघा. आपल्याकडे दृष्टीकोनही नाही, हे यातून दिसते” असे राहुल गांधी म्हणाले. पंतप्रधानांना प्रश्न विचारणे, ही माझी जबाबदारी आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले. “दृष्टीकोन देणे ही पंतप्रधानांची जबाबदारी आहे. पण मी, तुम्हाला खात्रीने सांगतो, की पंतप्रधानांकडे दूरदृष्टी नाहीय. त्यामुळेच चीनने आपल्या हद्दीत घुसखोरी केली आहे” असे राहुल गांधी म्हणाले.

Story img Loader