काश्मीर खोऱ्यातील हिंसाचारात ज्यांना जीव गमवावा लागला ते आमचेच बांधव असून देशाचा भाग आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्त्वाखाली शिष्टमंडळाने सोमवारी पंतप्रधानांची भेट घेतली. यावेळी मोदींनी काश्मीरमधील सद्यस्थितीबाबत चिंता आणि दु:ख व्यक्त केले. काश्मिरमधील हिंसाचारात ज्यांना आपले प्राण गमवावे लागले ते आमचे बांधव असून देशाचा अविभाज्य भाग असल्याचे मोदींनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना सांगितले. तसेच काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती पूर्ववत करण्याचे आवाहन करताना मोदींनी काश्मीरमधील परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी संवादाची गरज असल्याचे सांगितले. काश्मीरमध्ये स्थानिक तरूणांचा, लष्कारातील जवान किंवा पोलीस कोणाचाही बळी गेला तरी आम्ही अस्वस्थ होतो, असेही मोदींनी म्हटले.
दरम्यान, या बैठकीत ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने पंतप्रधान मोदींसमोर काश्मीरमधील परिस्थितीचा अहवाल सादर केला. काश्मीरमध्ये त्वरित पेलेट गन्सच्या वापरावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली. तसेच पंतप्रधानांनी लवकरात लवकर काश्मीर खोऱ्यातील सर्व संघटनांशी संवाद साधावा, अशी मागणीही या शिष्टमंडळाने केली.
हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वानी हा ८ जुलैला सुरक्षा दलांशी चकमकीत मारला गेला होता व त्यानंतर काश्मीरमध्ये सुरक्षा दले व निदर्शक यांच्यातील संघर्ष खूपच वाढला आहे. त्यामुळे सध्या काश्मीरमध्ये अशांततेचे वातावरण आहे.