PM Modi On Donald Trump and india China border dispute : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रसिद्ध अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमॅन यांच्याबरोबरचे पॉडकास्ट प्रसिद्ध झाले आहे. या पॉडकास्टमध्ये मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनबरोबर असलेल्या नात्यांबद्दल भाष्य केले आहे. यावेळी मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या विनम्रतेचे कौतुक केले आहे. ट्रम्प यांच्या डोक्यात त्यांचे प्रत्येक ध्येय साध्य करण्यासाठी स्पष्ट रोडमॅप आहे असेही ते म्हणाले आहेत. तसेच ट्रम्प यांच्या डोक्यात ‘अमेरिका फर्स्ट’ आहे पण मी ‘इंडिया फर्स्ट’च्या बाजूने आहे असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख करताना मोदी म्हणाले की, “सप्टेंबर २०१९मध्ये ह्युस्टन मध्ये झालेल्या हाऊडी मोदी कार्यक्रमात ट्रम्प आणि मी दोघे तेथे होतो आणि संपूर्ण स्टेडियम पूर्णपणे भरलेले होते. आम्ही दोघांनी भाषण केले आणि ते खाली बसून माझे भाषण ऐकत होते. ही त्यांची विनम्रता आहे. जेव्हा मी व्यासपीठावरून बोलत होतो, तेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष प्रेक्षकांमध्ये बसलेले होते, हा त्यांच्याकडून एक प्रकारचा इशारा होता. भाषणानंतर मी ट्रम्प यांना स्टेडियममध्ये फेरी मारण्याबद्दल विचारले आणि कोणतेही आढेवेढे न घेता तयार झाले आणि माझ्याबरोबर चालू लागले. त्यांच्या संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेला धक्का बसला, पण माझ्यासाठी तो क्षण खरोखरच हृदयस्पर्शी होता. यावरून मला दिसून आले की या व्यक्तीकडे धाडस आहे. तो स्वत:चे निर्णय स्वत: घेतो. ही परस्पर विश्वासाची भावना होती, आमच्यामध्ये एक मजबूत बंधन होते जे मी त्या दिवशी खरोखर पाहिले आणि त्या दिवशी सुरक्षा कर्मचार्‍यांना न विचारता हजारो लोकांच्या गर्दीतून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प चालताना पाहणं खरोखरच आश्चर्यकारक होते.”

मागच्या वर्षी जुलैमध्ये ट्रम्प यांच्या वर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करत पीएम मोदी म्हणाले की, “मी त्याच दृढ निश्चयी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना पाहिले, जे त्या स्टेडियममध्ये माझ्या हातात हात देऊन चालत होते. गोळी लागल्यानंतर देखील ते अमेरिकेकरिता निश्चल राहिले. त्यांचे आयुष्य त्यांच्या देशासाठी आहे. मला त्यांच्यात अमेरिका फर्स्टची भावना दिसून आली, तसाच जसा माझा नेशन फर्स्टवर विश्वास आहे. मी इंडिया फर्स्टच्या बाजून उभा आहे आणि हेच कारण आहे की आमचे इतक्या चांगल्या प्रकारे जुळते.”

त्यांच्या पहिल्या भेटीबद्दलची आठवण सांगताना मोदी म्हणाले की, “ज्या क्षणी मी व्हाईट हाऊसमध्ये पाऊल ठेवले, त्यांनी सर्व औपचारिक प्रोटोकॉल मोडले. त्यानंतर ते मला वयक्तिकरित्या व्हाईट हाऊस दाखवण्यासाठी घेऊन गेले. जेव्हा त्यांनी मला सगळा परिसर दाखवला तेव्हा मला एक खास गोष्ट दिसून आली की त्यांच्या हातात कोणतीही चिठ्ठी किंवा क्यू कार्ड नव्हते, तसेच त्यांच्या मदतीलाही कोणी नव्हते. त्यांनी स्वतः गोष्टी दाखवल्या. मला हे खूप प्रभावशाली वाटले. यातून दिसून आले की ते अध्यक्ष पदाची किती सन्मान करतात आणि अमेरिकेच्या इतिहासाशी कसे घट्टपणे जोडले गेलेले आहेत.”

चीनबरोबरच्या संबंधांवर मोदींचे भाष्य

पीएम मोदी यांना या पॉडकास्टमध्ये चीनबद्दल महत्त्वाची विधाने केली आहेत. ते म्हणाले की, “हे खरे आहे की आमच्यामध्ये सीमावाद सुरू आहे. २०२० मध्ये सीमेवर घडलेल्या घटनांमुळे आमच्या देशांमध्ये खूप तणाव निर्माण झाला. मात्र राष्ट्राध्यक्ष शी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर आमच्यातील सीमांवर परिस्थिती पूर्ववत होताना दिसत आहे. आता आम्ही २०२० त्या आधीची स्थिती परत आणण्यासाठी काम करत आहोत. हळूहळू पण निश्चितपणे विश्वास, उत्साह आणि ऊर्जा परत आणली जाईल. पण यासाठी काही वेळ लागेल, कारण पाच वर्ष अंतर पडले आहे. आमचे एकत्र येणे फायदेशीर तर आहेच याबरोबरच जागतिक स्थिरता आणि समृद्धीसाठी देखील आवश्यक आहे. कारण २१वे शतक हे आशियाचे आहे, त्यामुळे आमची इच्छा आहे की भारत आणि चीन यांच्यात निरोगी आणि स्वाभाविक पद्धतीची स्पर्धा असावी. स्पर्धा ही काही वाईट गोष्ट नाही, पण तिचे रुपांतर संघर्षात होता कामा नये.”

पुढे बोलताना पीएम मोदी म्हणाले की, “भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष हा नवीन नाही. दोन्ही देशांची संस्कृती आणि मान्यता आहेत. अधुनिक युगात देखील त्या महत्त्वाची भूमिका बजावतात. जर तुम्ही ऐतिहासिक रेकॉर्ड पाहिलं तर त्यामध्ये कित्येक शतकांपासून भारत आणि चीन एकमेकांना शिकवण देत आले आहेत. तसेच एकत्र येत नेहमीच त्यांनी जागतिक कल्याणासाठी योगदान दिले आहे. जुन्या रेकॉर्डनुसार एकेकाळी भारत आणि चीन हे जगाच्या जीडीपीचा ५० टक्के भाग होते. भारताचे योगदान इतके मोठे होते.”

पंतप्रधान मोदी या मुद्द्यांवर पुढे बोलताना म्हणाले की, “जर आपण काही शतके मागे जाऊन पाहिले, तर आमच्यात संघर्षाचा कुठलाही इतिहास नाही. हा इतिहास नेहमीच एकमेकांना शिकवण देणे आणि एकमेकांना समजून घेण्याचा राहिलेला आहे. एकेकाळी चीनमध्ये बौद्ध धर्माचा मोठा प्रभाव होता आणि तिथूनच मुळत: हे तत्त्वज्ञान पुढे आले. भविष्यातही आपले संबंध तितकेच मजबूत राहिले पाहिजेत. ते पुढे जात राहिले पाहिजे. अर्थात, मतभेद असणे स्वाभाविक आहे. जेव्हा दोन शेजारी देश असतात तेव्हा कधीकधी मतभेद होणे स्वाभाविक असते. कुटुंबातही नेहमीच सर्वकाही सुरळीत नसते. परंतु आमचे ध्येय हे आहे की हे मतभेद वादात रूपांतरित होऊ नयेत. आम्ही या दिशेने सक्रियपणे काम करत आहोत. मतभेदांऐवजी आम्ही संवादावर भर देतो, कारण फक्त संवादाच्या माध्यमातूनच एक स्थिर संबंध तयार केले जाऊ शकतात जे दोन्ही देशांच्या हितांची पूर्तता करतील.”