PM Modi On Wed in India : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जयपूरमधे ९ ते ११ डिसेंबर दरम्यान होणार्‍या ‘रायझिंग राजस्थान ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समिट’चे उद्घाटन केले. या सम्मेलनाचा उद्देश राजस्थानमधील गुंतवणूक वाढीस चालणे देणे हा असून या सम्मेलनात अनेक देशांचे प्रतिनिधी आणि आंतरराष्ट्रीय संघटना देखील सहभागी झाल्या आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ‘वेड इन इंडिया’ घोषणेचा राज्यातील पर्यटन वाढण्यास फायदा होईल असे मत मोदींनी व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मागील काही काळापासून वेड इन इंडिया संकल्पनेवर भर देताना दिसत आहेत. देशातील नामांकित जोडपी लग्न सोहळा परदेशात आयोजित करतात. त्यानंतर सरकारकडून वेड इन इंडियाचा प्रसार केला जात आहे. याअंतर्गत बाहेरच्या देशात होणारे भारतीयांचे लग्न समारंभ देशातच केले जावेत, जेणेकरून भारतीय अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा होईल असे आवाहन केले जात आहे.

राजस्थानमधील पर्यटनाच्या वाढीबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी यांनी याबद्दल भाष्य केले आहे. सम्मेलनात उपस्थित गुंतवणूकदारांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “मी देशातील नागरिकांना ‘वेड इन इंडिया’चे आवाहन केले आहे. याचा फायदा निश्चित राजस्थानला होईल. राजस्थानमध्ये हेरिटेज टुरिझम, फिल्म टुरिझम, इको टुरिझम, रुरल टुरिझम, बॉर्डर एरिया टुरिझम हे वाढवण्याच्या अनेक शक्यता आहेत. या क्षेत्रांमधील तुमची गुंतवणूक राजस्थानच्या पर्यटन क्षेत्राला बळ देईल आणि तुमचा उद्योग देखील वाढवेल”.

जगाला फायदा होतोय..

देशाच्या अर्थव्यवस्थेसंबंधी बोलताना मोदी पुढे म्हणाले की, “तुम्ही सगळे ग्लोबल सप्लाय आणि व्हॅल्यू चेनशी संबंधित अडचणी महिती आहेत. आज जगाला एका अशा अर्थव्यवस्थेची आवश्यकता आहे जी मोठ्यात मोठ्या संकटाच्या काळातदेखील मजबुतीने चालत राहिल. यासाठी भारतात व्यापक मेन्युफेक्चरिंग बेस उभारणे खूप आवश्यक आहे. हे फक्त भारतासाठी नाही तर जगाच्या अर्थव्यवस्थेसाठीदेखील महत्त्वाचे आहे.”

“भारताने मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आत्मनिर्भर होण्याचा संकल्प केला आहे. भारत मेक इन संकल्पनेनंतर लो कॉस्ट मेन्युफेक्चरिंग वर भर देत आहे. भारताचे पेट्रोलियम प्रोडक्ट, औषधे आणि लसी, इलेक्ट्रॉनिक साहित्य याच्या विक्रमी मॅन्युफॅक्चरिंगमुळे जगाला मोठा फायदा होत आहे. राजस्थानमधूनही गेल्या वर्षी ८४ हजार कोटींची निर्यात झाली आहे, यामद्ये इंजीनियरींग गुड्स, जेम्स अँड ज्वेलरी, टेक्सस्टाईल, हँडिक्राफ्ट आणि शेतीसंबंधी उत्पादनांचा वाटा देखील मोठा आहे”, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

भारतात उत्पादन वाढवण्यामध्ये पीएलआय योजनेचा सहभाग देखील वाढत आहे. सध्या इलेक्ट्रॉनिक्स, स्पेशालिटी स्टील, ऑटोमोबाईल्स आणि ऑटो कंपोनंट्स, सोलार पीव्हीज, फार्मासुटीकल ड्रग्ज या क्षेत्रांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. या योजनांमुळे किमान सव्वा लाख कोटींची गुंतवणूक आली आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi on wed in india in rajasthan global summit indian economy marathi news rak94