PM Modi praises rapper Hanumankind for his Song : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात रॅपर हनुमानकाइंड (Hanumankind) याचे कौतुक केले आहे. काही दिवसांपूर्वीच या रॅपरने त्याचे गाणे ‘रन इट अप’ रिलीज केले आहे आणि हे गाणे जगभरात ऐकले जात आहे. या गाण्याच्या माध्यमातून हनुमानकाइंडने जागतिक स्तरावर भारताची समृद्ध संस्कृती आणि परंपरा दाखवून दिल्याबद्दल मोदींनी त्याचे कौतुक केले आहे.

हनुमानकाइंड त्याच्या या गाण्यात पारंपारिक भारतीय मार्शल आर्ट्स जसे की कलारीपयट्टू, गटका आणि थांग-ता यासारख्या दाखवले आहेत. त्याच्या या प्रयत्नांची नरेंद्र मोदी यांनी त्यांचा दर महिन्याला होणारा रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’च्या १२० व्या भागात दखल घेतली आहे. यामध्ये पंतप्रधान मोदींनी हनुमानकाइंडचे अभिनंदन करत कौतुक केले आहे. त्याच्या प्रयत्नांमुळे जगभरातील लोकांना भारताच्या पारंपारिक मार्शल आर्ट्सबद्दल जाणून घेण्यास मदत झाल्याचेही पंतप्रधान म्हणाले आहेत.

पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले?

मन की बात कार्यक्रमात बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, “मित्रांनो, आपले स्वदेशी खेळ आता पॉप्युलर कल्चरचा भाग बनत आहेत. तुम्हा सगळ्यांना प्रसिद्ध रॅपर हनुमानकाइंड माहिती असेलच. त्याचे नवीन गाने ‘रन इट अप’ हे सध्या चांगलेच गाजत आहे. आपले पारंपरिक मार्शल आर्ट्स जसे की कलारीपयट्टू, गटका आणि थांग-ता यांचा त्यामध्ये समावेश आहे.”

पंतप्रधान मोदी पुढे बोलताना म्हणाले की, “मी हनुमानकाइंड यांचे अभिनंदन करतो की त्याच्या प्रयत्नांमुळे जगभरातील लोकांना आपल्या पारंपारिक मार्शल आर्ट्सबद्दल माहिती होत आहे.”

गेल्या वर्षी हनुमानकाइंडचे एक गाणे बिग डॉग्ज हे जगभरात गाजले होते. त्यानंतर त्याचे नवीन गाणे ‘रन इट अप’ प्रसिद्ध झाले आहे. या गाण्यालादेखील प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. या गाण्यात भारतातील वेगवेगळ्या राज्यांमधील मार्शल आर्ट्सची एक झलक पाहायला मिळत आहे.