राजकीय आघाडीवर सरकारची कोंडी करणाऱ्या महत्त्वपूर्ण भूसंपादन विधेयकावरील मतदानाच्या दिवशी दांडी मारणाऱ्या खा. पूनम महाजन व खा. प्रीतम मुंडे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप खासदारांच्या बैठकीत खरडपट्टी काढली. सुमारे २० दांडीबहाद्दर खासदारांना ‘तुम्हाला उपस्थित राहायचे नसेल तर इथे आलाच कशाला’, असे मोदींनी खडसावले. मोदी मास्तर केवळ खासदारांचीच ‘शाळा’ घेत नसून बडय़ा केंद्रीय मंत्र्यांचीदेखील ते कानउघाडणी करीत आहेत. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेच्या प्रस्तावात माकप नेते सीताराम येचुरी यांनी सुचवलेली सुधारणा मान्य झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू व राज्यमंत्री मुक्तार अब्बास नकवी यांचीदेखील सभागृह व्यवस्थापनावरून खरडपट्टी काढल्याचे सूत्रांनी सांगितले. तर केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी कानउघाडणी केली.
जमीन अधिग्रहण विधेयक हा मोदी सरकारसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा आहे. नेमक्या याच विधेयकावरील मतदानाच्या दिवशी बडय़ा दिवंगत भाजप नेत्यांच्या कन्या असलेल्या खासदार पूनम महाजन व प्रीतम मुंडे यांनी दांडी मारली होती. त्याखेरीज तब्बल २० सदस्य मतदानाच्या दिवशी  गैरहजर होते. दर मंगळवारी होणाऱ्या खासदार बैठकीत वैंकय्या यांनी या २० खासदारांची नावेच वाचून दाखवली. त्यावर ‘इतरांना तुम्हाला बघू द्या’, असे सुनावत नरेंद्र मोदी यांनी पूनम महाजन, प्रीतम मुंडे व इतर खासदारांना उभे राहण्याचे फर्मान सोडले. याशिवाय नावे पुकारण्यात आलेले इतर खासदारही उभे राहिले. त्यांना पाहून ‘तुम्हाला उपस्थित राहायचे नसेल तर तुम्ही कशाला इथे आलात’, अशी खरडपट्टी मोदींनी या खासदारांची काढली. दांडीबहाद्दर खासदारांनी मान खाली घालून मुकाटपणे मोदींचे म्हणणे ऐकून घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा