PM Modi Om Memes With Italy PM Giorgia Meloni : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झेरोधाचे संस्थापक निखिल कामथ यांना मुलाखत दिली आहे. कामथ यांचे व्हिडीओ पॉडकास्ट ‘People By WTF’ मध्ये सहभागी झालेल्या पंतप्रधान मोदींनी या मुलाखतीदरम्यान अनेक हलक्या फुलक्या मुद्द्यांवर भाष्य केले. इतकेच नाही तर पंतप्रधान मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याबाबतच्या व्हायरल झालेल्या ‘मेलोडी मीम्स’ संबंधी प्रश्नाला देखील उत्तर दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निखिल कामथ यांनी पंतप्रधान मोदी यांनी प्रश्न विचारला की, इंटरनेटवर लोकांचं म्हणणं आहे की तुम्हाला इटलीबद्दल बरीच माहिती आहे, तुम्ही यासंबंधी मीम्स पाहिल्या नाहीत का? यावर मोदींनी हसून आपण मीम्स पाहण्यात वेळ वाया घालवत नसल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, “ते तर चालत राहतं (वो तो चलता रहता है), मी त्याच्यावर माझा वेळ वाया घालवत नाही”.

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी यांनी आपण फूडी नसल्याचे स्पष्ट केले. मेन्यू दिला तर काय खावं याचा निर्णय आपण घेऊ शकणार नाही असेही पंतप्रधान म्हणाले. “मी खाण्याच्या शौकीन लोकांप्रमाणे नाही. त्यामुळे मी ज्या देशात जातो तिथे मला जे काही वाढलं जातं ते मी आनंदाने खातो. माझं दुर्भाग्य हे आहे की, आज मला जर तुम्हा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेलात आणि मला मेनू दिला, तर मी काय खावं हे ठरवू शकणार नाही”, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांनी पुढे बोलताना त्यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये काम करतानाची आठवण देखील सांगितली. रेस्टॉरंटमध्ये काय खावं हे ठरवण्यासाठी आपण अरूण जेटली यांना बरोबर घेऊन जायचो असेही मोदी म्हणाले. त्यांनी सांगितलं की, “जेव्हा मी संघटनेचं काम करायचो तेव्हा अरूण जेटली हे खाण्याचे मोठे शौकीन होते. भारताच्या कोणत्या शहरातील कोणत्या रेस्टॉरंटमध्ये कोणता पदार्थ चांगला मिळतो याचा ते एनसायक्लोपीडिया होते. बाहेर गेल्यावर त्यांच्याबरोबर रात्रीचे जेवण होत असे. पण आज जर मला कोणी मेन्यू दिला आणि निवड करण्यास सांगितलं तर मी करू शकत नाही. करण मी जेव्हा नाव वाचतो आणि हा तोच पदार्थ आहे याचं मला ज्ञान नाही, त्याबद्दल मी अज्ञानी आहे. त्याची मला इतकी समज नाही. त्यामुळे मी नेहमी अरूण जेटली यांना ऑर्डर द्यायला सांगत असे, जेवण शाकाहारी आसावं इतकीचं माझं म्हणणं असे”.

हेही वाचा>> Italy Village Bans People From Getting Ill : इटलीतील या गावात आजारी पडायला बंदी आहे! मेयरच्या या फतव्यामागे आहे हृदयद्रावक कारण

नेमकं काय झालं होतं?

इटलीमध्ये झालेल्या जी७ समीटमध्ये नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी हे एकमेकांशी बोलताना दिसून आले होते. तसेच इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पीएम मोदींसोबत काढलेला सेल्फी फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, COP-28 मधील चांगली मैत्री…#Melodi. जॉर्जिया मेलोनी यांनी मोदी आणि मेलोनी या आडनावांचा वापर करून तयार केलेला हॅशटॅग #Melody हा सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड झाला होता. विशेषत:एक्सवर युजर्स #Melody चा वापर करून मजेशीर पोस्ट, मीम्स शेअर करण्यात आल्या होत्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi reaction on memes with italy pm giorgia meloni viral melodi memes nikhil kamath podcast rak