PM Modi awarded Order of Mubarak Al-Kabeer : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी कुवेतच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यावेळी मोदी यांना कुवेतच्या सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात आले आहे. भारत आणि कुवेतदरम्यानचे संबंध अधिक बळकट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवेतचा ‘द ऑर्डर ऑफ मुबारक अल-कबीर’ हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मोदी यांना एखाद्या राष्ट्राकडून मिळालेला हा २०वा पुरस्कार आहे.

‘द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर’ ही कुवेतमधील नाइटहूडची ऑर्डर आहे. हा पुरस्कार एखाद्या देशाचे प्रमुख आणि राजघराण्यातील सदस्यांना मैत्रीचे प्रतीक म्हणून दिले जातो. यापूर्वी हा पुरस्कार बील क्लिंटन, प्रिन्स चार्ल्स आणि जॉर्ज बुश अशा जागतिक स्तरावरील नेत्यांना देण्यात आला आहे. कुवेतमधील बायन पॅलेस येथे अमिर शेख मेशल अल-अहमद अल-जेबर अल-सबाह यांनी मोदींना हा पुरस्कार दिला. यानंतर हा सन्मान आपण भारतीयांना आणि भारत-कुवेत मैत्रीला अर्पण करत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’वर लिहिले.

४३ वर्षात पहिली भेट

कुवेतच्या भेटीदरम्यान पंतप्रधानांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. याबरोबरच बायन पॅलेसमध्ये त्यांना गार्ड ऑफ ऑनर देखील देण्यात आला. कुवेतचे अमिर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह हे या समारंभाला उपस्थित होते. पंतप्रधान मोदी हे शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांच्या निमंत्रणावरून दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर गेले होते. ४३ वर्षांमध्ये भारतीय पंतप्रधानांनी कुवेतला दिलेली ही पहिलीच अधिकृत भेट आहे.

हेही वाचा>> सरकारी योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये चक्क सनी लिओनीचे नाव; महिन्याला मिळत होते हजार रुपय…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान कुवेतमध्ये राहाणाऱ्या भारतीयांमध्ये उत्साह दिसून आला. नरेंद्र मोदी यांनी कुवेतमधील शेख साद अल अब्दुल्ला इनडोअर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या ‘हला मोदी’ कार्यक्रमात भारतीय समुदायाला संबोधीत केले. शनिवारी पंतप्रधान मोदी यांनी कुवेतमधील गल्फ स्पिक इम्प्लॉइज कॅम्पला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी भारतीय कामकारांशी चर्चा देखील केली.

पंतप्रधान मोदी आणि कुवेतचे अमिर यांनी माहिती तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र, फिनटेक, पायाभूत सुविधा आणि सुरक्षा या क्षेत्रांमध्ये संबंधांना चालना देण्यावर भर दिला. अमिर शेख मेशल यांच्याबरोबरची बैठक अतिशय उत्तम झाली असे पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’वर लिहिले. तर, ‘‘या दोन्ही नेत्यांनी भारत-कुवेत संबंध अधिक उंचीवर नेण्यासाठी विविध मार्ग शोधण्यावर भर दिला,’’ असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले.

Story img Loader