नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या चार दिवसांत दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी बैठक घेतली. यावेळी राज्यातील सुरक्षेचा आढावा घेतानाच दहशतवाद प्रतिबंधक उपाययोजनांची पूर्ण क्षमतेने अंमलबजावणी करण्याचे आदेश यंत्रणांना दिले. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
काश्मीरमधील सुरक्षेचा सखोल आढावा घेताना पंतप्रधानांनी पंतप्रधानांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशीदेखील चर्चा केली. बैठकीत सुरक्षा दलांच्या तैनातीबरोबरच दहशतवादविरोधी उपाययोजनांबाबत विचारविनिमय झाल्याचे सूत्रांनी सांगितले. याखेरीज पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. सिन्हा यांनी स्थानिक प्रशासनाने सुरक्षेबाबत उचललेल्या पावलांची माहिती दिली. सुरक्षाविषयक परिस्थितीची संपूर्ण माहिती पंतप्रधानांपुढे सादर करण्यात आली.
चार दिवसांत चार हल्ले
गेल्या चार दिवसांत जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी चार हल्ले केले आहेत. रईसी जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यात बस दरीत कोसळून वैष्णोदेवीला जाणाऱ्या नऊ भाविकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कथुआ आणि डोडा जिल्ह्यांतही दहशतवादी हल्ले झाले. यात एक जवान शहीद झाला असून नऊ जण जखमी आहेत. कथुआमध्ये चकमकीत दोन संशयित पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले असून अद्याप या परिसरातील शोधमोहीम सुरू आहे.
हेही वाचा >>> कुवेत आग दुर्घटना: मृत्युमुखी पडलेल्यांची डीएनए चाचणी, पार्थिव आणण्यासाठी हवाई दलाचे विमान सज्ज
डोभाल तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार
●देशातील सर्वात नावाजलेले व अनुभवी हेर अजित डोभाल यांची केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी फेरनियु्क्ती केली आहे. मंत्रिमंडळाच्या समितीने त्यांच्या नियुक्तीला गुरुवारी मान्यता दिली.
●सलग तीन वेळा या पदावर विराजमान होणारे ते पहिलेच अधिकारी आहेत. मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर, मे २०१४ मध्ये डोभाल यांच्याकडे हे महत्त्वाचे पद सोपविले होते. त्यानंतर २०१९ आणि आता २०२४ अशी सलग तिसऱ्यांदा त्यांच्याकडे राष्ट्रीय सुरक्षेबाबत मंत्रिमंडळाला सल्ला देण्याची महत्त्वाची जबाबदारी असेल. डोभाल यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा आहे.
●भारतीय पोलीस सेवेतील १९६८ च्या तुकडीचे अधिकारी असलेले डोभाल हे दहशतवादविरोधी उपाययोजनांमध्ये निष्णात मानले जातात. ईशान्येकडील राज्ये, पंजाब, जम्मू-काश्मीर येथे प्रत्यक्ष कामाचा ३३ वर्षांचा अनुभव डोभाल यांच्या गाठीशी आहे. ते तब्बल सहा वर्षे पाकिस्तानात देशासाठी हेरगिरी करीत असल्याचेही सांगितले जाते.