PM Modi Russia Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत. रशियातील कझान शहरात होत असलेल्या १६ व्या ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेसाठी मोदी हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आमंत्रणानंतर या परिषदेसाठी पोहोचले आहेत. २३ आणि २४ ऑक्टोबर रोजी कझान शहरात ‘ब्रिक्स’ शिखर परिषद होत आहे. या शिखर परिषदेत मोदी सहभागी होणार आहेत. दरम्यान, मोदींच्या या दौऱ्यात व्लादिमीर पुतिन यांच्याबरोबर विविध विषयांवर द्विपक्षीय चर्चा झाली. यावेळी रशिया-युक्रेन संघर्षाचे शांततापूर्ण भूमिकेचा पुनरुच्चार करत पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा शांततेचं आवाहन केलं.
गेल्या तीन महिन्यात पंतप्रधान मोदी दुसऱ्यांदा रशियाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यावेळी रशियाने केलेल्या आदरातिथ्याबाबत मोदींनी आभार व्यक्त केले. पण यावेळी व्लादिमीर पुतिन यांनी केलेल्या एका मिश्किल वक्तव्याची चर्चा रंगली आहे. व्लादिमीर पुतिन यांनी रशिया आणि भारत या दोन्ही देशातील घनिष्ठ संबंधांबाबत भाष्य केलं. मॉस्को आणि नवी दिल्ली यांच्यातील संबंधांना विशेष विशेषाधिकार आहे आणि ते गतिमानपणे विकसित होत आहेत, असं व्लादिमीर पुतिन यांनी म्हटलं. तसेच ‘आमचे संबंध एवढे घनिष्ठ आहेत की आम्हाला कोणत्याही अनुवादकाची गरज नाही’, अशी मिश्किल टिप्पणी पुतिन यांनी केली. पुतिन यांच्या या टिप्पणीचा हिंदी अनुवाद ऐकून पंतप्रधान मोदीही हसले.
हेही वाचा : इंदिरा गांधी ते नरेंद्र मोदी; पंतप्रधान ट्रुडो पिता-पुत्रांमुळे भारत-कॅनडात वादाची ठिणगी कशी पडली?
व्लादिमीर पुतिन यांनी यावेळी जुलैमध्ये मॉस्को येथे झालेल्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेदरम्यान त्यांच्या भेटीची आठवणही सांगितली. ते म्हणाले, “मला आठवतं की आम्ही जुलैमध्ये भेटलो होतो आणि अनेक मुद्द्यांवर चर्चाही झाली होती. आम्ही दूरध्वनीवरूनही अनेकदा संवाद साधत असतो. काझानला येण्याचे आमंत्रण स्वीकारल्याबद्दल मी मोदींचे आभार व्यक्त करतो. आज आम्ही या कार्यक्रमात सहभागी होत आहोत”, असं ते यावेळी म्हणाले.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं की, “गेल्या तीन महिन्यांतील त्यांच्या दोन रशियाच्या भेटी दोन्ही देशांमधील घनिष्ठ समन्वय आणि सखोल मैत्री दर्शवतात. ब्रिक्स शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी मी उत्सुक आहे. जुलैमध्ये मॉस्को येथे झालेल्या वार्षिक शिखर परिषदेने प्रत्येक क्षेत्रात आमचे सहकार्य मजबूत करण्याचा प्रयत्न केला. १५ वर्षांत ब्रिक्सने आपली खास ओळख निर्माण केली. आता अनेक जगातील देशांना त्यात सामील व्हायचे आहे”, असं मोदींनी म्हटलं.
#WATCH | Kazan, Russia: "We have such a relationship that I felt that you do not need any translation" said Russian President Vladimir Putin at the bilateral meeting with Prime Minister Narendra Modi
— ANI (@ANI) October 22, 2024
(Source: Host Broadcaster via Reuters) pic.twitter.com/Cvq7pMFeGj
मोदी आणि जिनपिंग यांच्यात आज चर्चा होणार?
पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची बुधवारी द्विपक्षीय चर्चा होणार असल्याची माहिती परराष्ट्र विभागाचे सचिव विक्रम मिस्री यांच्याकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यामध्ये होणाऱ्या या द्विपक्षीय चर्चेकडे दोन्ही देशाचे लक्ष लागलेले आहे.
ब्रिक्स म्हणजे काय?
ब्रिक्स हा ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे देश एकत्र येऊन ‘ब्रिक’ नावाचे एक संघटन तयार करण्यात आले आहे. २००१ मध्ये गोल्डमन सॅक्सचे विश्लेषक जिम ओ’नील यांनी ब्राझील, रशिया, भारत आणि चीन या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचे वर्णन करण्यासाठी ब्रिक हा शब्द वापरला. या शब्दाचा स्वीकार करून पहिली ब्रिक शिखर परिषद १६ जून २००९ रोजी रशियातील येकातेरिनबर्ग येथे झाली. सर्वात वेगाने वाढणाऱ्या विकसनशील देशांना एकत्र आणण्यासाठी, त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि पाश्चात्य शक्तींचे वर्चस्व असलेल्या आंतरराष्ट्रीय संस्थांचा सामना करण्यासाठी या गटाची स्थापना करण्यात आली होती. २०१० मध्ये या संघटनेत दक्षिण आफ्रिका सामील झाल्यानंतर संघटनेला ब्रिक्स असे नाव देण्यात आले.