नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपाला राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यात विजय मिळाला. तीनही राज्यात मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीसाठी मोठ्या नेत्यांची फळी असतानाही भाजपाने नव्या चेहऱ्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ही पदे देऊ केली. भाजपाच्या या राजकीय खेळीने अनेकांना आश्चर्यचकित केले असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मात्र यात काही नवीन वाटत नाही. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध प्रश्नांवर भूमिका मांडली असून भाजपाकडून नव्या चेहऱ्यांना संधी का दिली जाते? यावरही त्यांनी मुलाखतीमध्ये भाष्य केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तीन राज्यात सत्ता स्थापन करत असताना भाजपाने राजस्थान येथे पहिल्यांदाच निवडून आलेल्या भजनलाल शर्मा यांना मुख्यंमत्रीपदाची जबाबदारी दिली. तर मध्य प्रदेशमध्ये मोहन यादव आणि छत्तीसगडमध्ये विष्णू देव साय यांना संधी दिली. भाजपाच्या या निर्णयाचे अनेकांना आश्चर्य वाटले होते.

हे वाचा >> विश्लेषण: मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानमध्ये भाजपकडून ‘बिनचेहऱ्याचे’ मुख्यमंत्री का?

आमदार नसतानाही मी मुख्यमंत्री झालो..

इंडिया टुडेकडून पंतप्रधान मोदी यांना ‘न्यूजमेकर ऑफ द इयर’ हा सन्मान देण्यात आला यावेळी घेतलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदी या विषयावर बोलताना म्हणाले, “नव्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबत सांगायचे झाल्यास माझेच सर्वात मोठे उदाहरण आहे. मी जेव्हा गुजरातचा मुख्यंमत्री झालो होतो, तेव्हा मलाही प्रशासनाचा कोणताच अनुभव नव्हता. तसेच त्याआधी मी विधानसभेतही निवडून आलो नव्हतो.”

२००१ साली तत्कालीन मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर चार महिन्यांनी ते विधानसभेवर निवडून गेले होते. “भाजपा कार्यकर्त्यांवर आधारित पक्ष आहे. त्यामुळे पक्षाकडून अशाप्रकारचे विविध प्रयोग केले जात असतात”, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

ते पुढे म्हणाले, एकाच वेळी अनेक पिढ्यांचे नेतृत्व घडविण्याची क्षमता भाजपामध्ये आहे. भाजपाच्या अध्यक्षांकडे पाहा, तुम्हाला दरवेळी नवीन चेहऱ्यांना तिथे संधी दिल्याचे पाहायला मिळेल. तसेच गुजरातच्या मंत्रिमंडळात आणि दिल्ली महानगरपालिकेतही अशाच प्रकारे नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

आणखी वाचा >> “आमच्याकडे कोण मुख्यमंत्री होईल सांगता येत नाही”, देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी; सभागृहात हशा!

“लोकशाहीमध्ये तरूणांना आणि नव्या चेहऱ्यांना योग्य त्या संधी दिल्या गेल्या पाहीजेत. ही लोकशाही प्रक्रियाच लोकशाहीला आणखी चैतन्यशील बनवते”, हे सांगताना पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. ते म्हणाले, घराणेशाही जपणाऱ्या पक्षांना लोकशाहीची प्रक्रिया आचरणात आणणे कठीण जाते.

“इतर पक्ष घराणेशाहीने बरबटलेले असताना भाजपाने तीनही राज्यात नव्या चेहऱ्यांना संधी देऊन एक नवीन पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे लोकशाही प्रक्रिया चैतन्यशील तर होतेच, त्याशिवाय कार्यकर्त्यांच्याही आशा पल्लवित होतात. आपल्यालाही संधी दिली जाऊ शकते, या भावनेतून कार्यकर्ते आणखी जोमाने काम करतात, ज्यामुळे पक्षाची वाढ होत राहते”, अशी भूमिका नवीन चेहऱ्यांना संधी देण्यामागे असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi says bjp choosing fresh faces as chief ministers not new trend kvg
Show comments