२०१३ मध्ये उत्तर भारतातील काही भागात झालेल्या ढगफुटीमुळे मोठे नुकसान झाले होते. केदारनाथ आणि परिसरालाही या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला होता. तेव्हा हा परिसर विकसित करण्याचे, पर्यटकांसाठी सुविधा निर्माण करण्याचं मोठं आव्हान होतं. मात्र आता या परिसरात विविध विकास कामांना सुरुवात झाली आहे, अनेक कामे ही पुर्ण झाली आहेत, अनेक कामे पुर्ण होण्याच्या मार्गावर आहेत.
याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या केदारनाथ दौऱ्यात भावना व्यक्त केल्या. मोदी म्हणाले म्हणाले, ” २०१३ नंतर लोकं विचार करत होती की केदारनाथ पुन्हा उभं राहील का ?. पण माझा आतला आवाज सांगत होता की केदारनाथ पुन्हा उभं राहील, विकसित होईल. कच्छ इथे भूकंपनानंतर केलेल्या पुर्नउभारणीचा अनुभव मला होता. मी दिल्लीत बसून इथल्या कामावर लक्ष ठेवून होतो. ड्रोनने घेतलेल्या फुटेजच्या मार्फत इथल्या विकास कामांचा आढावा घेत होतो”
पंतप्रधान मोदी यांनी केदारनाथ इथे आज १३० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उ्घाटन केले. या विकास कामांमध्ये मंदाकिनी नदीच्या बाजुला संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. पुरोहीत यांच्यासाठी निवास व्यवस्था, मंदाकिनी नदीवर पूल अशा विविध कामांचा समावेश आहे. याआधीच केदारनाथसह चारही धाम यांना बारमाही रस्त्याने जोडण्याच्या प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. तसंच केदारनाथ इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी निवास व्यवस्था, सोईसुविधा, केदारनाथ इथे सुसज्ज रुग्णालय, पर्यटन सुविधा केंद्र अशी विविध कामे सुरु आहेत. यामुळे भविष्यात केदारनाथ इथला प्रवास सुखकर होणार आहे.