पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी ‘सुरक्षेतील गंभीर त्रुटी’मुळे पंजाबचा दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परतावे लागल्यानंतर, आता राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेत पंजाब पोलिसांकडून हलगर्जीपणा झाल्याचे नमूद करत केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भातील अहवाल मागवला़ असुन, या घटनेवरून भाजपा आणि काँग्रेसने परस्परांवर टीकेचा भडिमार सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवरच आता काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
मोठी बातमी! आंदोलकांनी रस्ता अडवल्याने मोदींचा ताफा अडकून पडला; रद्द करावी लागली सभा
या प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांन पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली आहे. तसेच, सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री चन्नी यांच्याशी चर्चा केली आणि म्हटले की, “मोदी हे संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहेत, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेण्यात यावी. या प्रकरणी जो कोणी जबाबदार असेल त्यांच्यावर कारवाई करावी”. तसेच, या दौऱ्यासाठी संपूर्ण सुरक्षा व्यवस्था ठेवायला हवी होती. असं देखील सोनिया गांधी चन्नी यांना म्हणाल्या असल्याचं समोर आलं आहे.
मुख्यमंत्री चन्नी यांचे सोनिया गांधी यांना उत्तर –
पंजाब सरकार या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत असल्याचे चन्नी यांनी सोनिया गांधी यांना सांगितले. तसेच, यासाठी निवृत्त न्यायमूर्ती मेहताब सिंग गिल आणि राज्याचे गृहसचिव अनुराग वर्मा यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीला ३ दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. त्यात जो कोणी जबाबदार असेल, त्याच्यावर सरकार कारवाई करेल. अशी माहिती चन्नी यांनी सोनिया गांधी यांना दिली आहे.
… या अगोदर चन्नी यांनी भाजपाला काय दिलं होतं प्रत्युत्तर –
तर या अगोदर भाजपाच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना चन्नी यांनी म्हटले होते की, “पंतप्रधानांच्या सुरक्षेत कोणतीही त्रुटी राहिलेली नाही. पंतप्रधानांनी शेवटच्या क्षणी गाडीने जाण्याचा निर्णय घेतला. ते हेलिकॉप्टरने जाणार असल्याचं नियोजन होतं”, तसेच,. “फिरोजपूर जिल्ह्यातून पंतप्रधानांना त्यांचा दौरा अर्धवट सोडून परत जावं लागलं याविषयी मी खेद व्यक्त करतो. आम्ही आमच्या पंतप्रधानांचा आदर करतो. पंतप्रधानांचं स्वागत करण्यासाठी मी भटिंडाला जाणं अपेक्षित होतं. पण माझ्यासोबत असलेल्यांपैकी काहीजण करोना पॉझिटिव्ह आल्यामुळे मी पंतप्रधानांचं स्वागत करण्यासाठी जाऊ शकलो नाही. आम्ही पंतप्रधान कार्यालयाला कळवलं होतं की तुम्ही हा दौरा रद्द करावा. कारण वातावरण आणि आंदोलकांचा मुद्दा होता. त्यांनी अचाकन त्यांच्या मार्गामध्ये बदल केल्याची माहिती आमच्याकडे नव्हती”, असंही चरणजीतसिंग चन्नी म्हणालेले आहेत.
“दिल्लीच्या सीमेवर शेतकरी वर्षभर बसून होते, आता पंतप्रधानांना फक्त १५ मिनिटं थांबावं लागलं तर…”
या घटनेच्या पार्श्वभूमीवर पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी एका जाहीर सभेत बोलताना, पंतप्रधान मोदींवर निशाणा साधल्याचे दिसून आले आहे.
“ … असं होतं तर मग ते तिथे गेलेच कशाला होते?” ; राकेश टिकैत यांचा मोदींवर निशाणा!
भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांनी प्रतिक्रिया देताना, पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. “ केंद्र सरकार म्हणते की सुरक्षेत त्रुटी होती आणि पंजाब सरकार म्हणते की पंतप्रधान तिथे गेले नाहीत कारण त्यांच्या रॅलीतील खुर्च्या रिकाम्या होत्या. दोघेही केवळ स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. पंतप्रधानांनी तिथे जायला नको होते.” असं राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे.
“… आम्हाला वाटलं ते आम्हाला फसवत आहेत” ; पंजाबच्या घटनेवर शेतकरी नेते सुरजित सिंग यांचं मोठं विधान
तर, भारतीय किसान युनियन (क्रांतीकारी) प्रमुख सुरजित सिंग फूल यांनी म्हटले आहे की, “फिरोजपूरच्या एसएसपी यांनी आम्हाला हे सांगून रस्ता मोकळा करण्यास सांगितले की, पंतप्रधान या रस्त्याने रॅलीच्या ठिकाणी जात आहेत. आम्हाला वाटलं की, आम्हाला फसवून भाजपा नेत्यांच्या बसेस तिथून काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्या मार्गाने पंतप्रधान येत आहेत हे आम्हाला खरेच माहीत नव्हते. रस्त्यावर बरीच वाहने होती.”