निवडणुकीच्या सत्ताबाजारात एकमेकांची उणीदुणी काढण्याची एकही संधी न सोडणारे दोन दिग्गज, पंतप्रधान मनमोहन सिंग आणि भाजपचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मंगळवारी येथे एकाच व्यासपीठावर आले. निमित्त होते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अहमदाबादेतील संग्रहालयाच्या उद्घाटनाचे. व्यासपीठावर आगमन होताच पंतप्रधान आणि मोदी शेजारीशेजारीच बसले. सत्कार-समारंभाचा कार्यक्रम होईपर्यंत दोघेही हास्यविनोद करताना दिसत होते. त्यामुळे सातत्याने एकमेकांवर टीका करणारे दोन्ही नेते शेजारी बसल्याचे चित्र कॅमेरात टिपण्यात छायाचित्रकारांची स्पर्धा सुरू होती.

वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले असते तर आजचा भारत वेगळा दिसला असता. आज भारताची एकता आणि अखंडता धोक्यात आली आहे. दहशतवाद, नक्षलवाद अशा सर्व आघाडय़ांवर देश संकटात आहे. अशा वेळी सरदार पटेलांसारख्या कणखर आणि पोलादी नेतृत्वाची गरज प्रकर्षांने जाणवते.       
 नरेंद्र मोदी

सरदार वल्लभभाई हे खऱ्या अर्थाने काँग्रेसचे पाईक होते. त्यांना जातीयवाद कधीच मान्य नव्हता. ते अंतर्बाह्य़ धर्मनिरपेक्ष होते. आज ही तत्त्वे अंगी बाणवण्याची खरी गरज असून येथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला हे मान्यच करावे लागेल.
    – मनमोहन सिंग</strong>