देशवासीयांशी संवाद साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या मासिक भाषणात रविवारी ‘बेटी बचाओ’, पर्यावरण संरक्षण व सामाजिक सुरक्षा यासह अनेक सामाजिक प्रश्नांचा ऊहापोह केला. मात्र आयपीएलचे माजी प्रमुख ललित मोदी यांच्या मुद्दय़ावर सध्या जे राजकीय वादळ उठले आहे त्याचा त्यांनी उल्लेखही न केल्यामुळे विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीका केली. हा मुद्दा त्यांचा पिच्छा पुरवेल, असे काँग्रेसने सांगितले.  पंतप्रधानांनी राजकारणावर बोलणे टाळले. सध्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना हैराण करणाऱ्या ललित मोदी यांच्या वादग्रस्त मुद्दय़ावर काहींची अपेक्षा होती, त्यानुसार मोदी यांनी अवाक्षरही काढले नाही.
हा कार्यक्रम प्रसारित झाल्यानंतर विविध विरोधी पक्षांच्या प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली. ललित मोदी वादावर बोलण्यास पंतप्रधान ‘अपयशी’ ठरल्याबद्दल काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी निराशा व्यक्त केली. त्यांचे पक्षातील सहकाऱ्यांसह भाकप व ‘आप’ या पक्षांनीही मोदी यांच्यावर टीका केली.
सध्या गाजणाऱ्या वादांबाबत मोदी यांनी मौन बाळगल्याबद्दल तामिळनाडूतील पुदुकोट्टाई येथे एका कार्यक्रमात माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मनमोहन सिंग यांना ‘मौनीबाबा’ म्हणणारे मोदी आता स्वत:च मौन पाळत आहेत, अशी टीका त्यांनी राजे यांच्या ललित मोदी यांच्याशी असलेल्या संबंधामुळे निर्माण झालेल्या वादाच्या संदर्भात केली. तर सक्तवसुली संचालनालयाने दाखल केलेल्या प्रकरणांमधून ललित मोदी यांची सुटका करण्यास पंतप्रधान मदत करत असल्याचा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी केला.पंतप्रधान ‘मन की बात’ सांगतात, परंतु गेल्या पंधरवडय़ात ललित मोदी यांच्यासंबंधीचा वाद उद्भवल्यावर जे मूलभूत प्रश्न निर्माण झाले आहेत, त्यांची उत्तरे त्यांनी दिलेली नाहीत, असे सिंग म्हणाले. भाकपचे डी. राजा व ‘आप’चे आशीष खेतान यांनीही मोदी यांच्यावर टीका केली.
पंतप्रधानांवर टीका केल्याबद्दल भाजपचे प्रवक्ते सांबित पात्रा यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला. नरेंद्र मोदी हे मुलींचे संरक्षण, सामाजिक सुरक्षा आणि जलसंधारण यासारख्या समर्पक मुद्दय़ांवर बोलले. काँग्रेसच्या निराशेचे निराकरण करण्याव्यतिरिक्त अनेक मुद्दे आहेत, असा टोला त्यांनी हाणला.

मोदी काय म्हणाले?
देशातील १० जिल्ह्य़ांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींच्या घटलेल्या प्रमाणाबाबत मोदी यांनी चिंता व्यक्त केली. विशेषत: हरयाणामध्ये याबाबतची परिस्थिती अतिशय गंभीर असून, मुलींना वाचवण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर ‘बेटी बचाओ’ मोहीम हाती घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

वीस मिनिटांच्या भाषणात पंतप्रधानांनी सरकारने अलीकडेच लागू केलेल्या सामाजिक सुरक्षेच्या तीन योजना, २०२२ सालापर्यंत ‘सर्वासाठी घर’ यासह तीन विकास योजना, तसेच २१ जून रोजी साजरा झालेला आंतरराष्ट्रीय योग दिवस यांचा उल्लेख केला. पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी पाण्याची बचत करण्याची व झाडे लावण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.

देशभरात कुणालाही ‘मन की बात’ ऐकायची नाही.. प्रत्येकाला या कार्यक्रमात लोकांचा आवाज ऐकायचा आहे. परदेशात केवळ स्वप्ने विकणारे मोदी या कार्यक्रमातही ‘स्वप्नांचे व्यापारी’ झालेले आहेत. भ्रष्टाचारात गुंतलेल्यांविरुद्ध तत्काळ कारवाई करणे हे पंतप्रधानांच्या हिताचेआहे, अन्यथा देशात किंवा जगात ते जिथे कुठे जातील, तिथे हे भूत त्यांचा पाठलाग करेल.
 –  गुलाम नबी आझाद, काँग्रेस नेते

Story img Loader