नवादा (बिहार) : अनुच्छेद ३७०च्या मुद्दयावरून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस अध्यक्षांची मानसिकता तुकडे-तुकडे टोळीसारखी आहे, असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी रविवारी केला. तर काँग्रेसने राजकीय पक्ष म्हणून राहण्याचा नैतिक अधिकार गमावला असल्याचा दावा भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केला.
राजस्थानमधील जयपूर येथे शनिवारी झालेल्या सभेत खरगे यांनी ‘‘जम्मू आणि काश्मीर व राजस्थानचा काय संबंध? राजस्थानात झालेल्या सभेत पंतप्रधान मोदी अनुच्छेद ३७०बद्दल का बोलत आहेत, ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर का बोलत नाहीत?’’ अशी टीका केली होती. त्याला खरगे यांचे नाव न घेता मोदी यांनी उत्तर दिले.
हेही वाचा >>> ‘बेरोजगारी हा निवडणुकीतील मोठा मुद्दा’
बिहारमधील नवादा येथील प्रचार सभेत बोलताना मोदी म्हणाले की, ‘‘काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांचे पद ही काही लहान बाब नाही. त्यांना असे वाटते की अनुच्छेद ३७०चा राजस्थानशी काहीही संबंध नाही. जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग नाही का? त्यांची मानसिकता तुकडे-तुकडे टोळीसारखी आहे.’’
मोदी पुढे म्हणाले की, ‘‘इंडिया आघाडी राज्यघटनेविषयी बोलते. त्यांच्या नेत्यांनी लोकांना सांगावे की त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान जम्मू आणि काश्मीरमध्ये पूर्णपणे राबवता का आले नाही? हे करण्यासाठी मोदींची गरज का पडली?’’ या वेळी त्यांनी कर्नाटकचे काँग्रेस खासदार डी के सुरेश यांच्या स्वतंत्र दक्षिण भारताच्या विधानाचाही संदर्भ दिला. यावरून काँग्रेसची मानसिकता समजते असा दावा मोदींनी केला. भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी आरोप केला की, ‘‘काश्मीरच्या विलीनीकरणाचा इतर राज्यांशी काय संबंध असे जर काँग्रेस पक्ष म्हणत असेल तर त्यांना देशाच्या एकता आणि अखंडत्वासाठी घेतलेल्या शपथेविषयी कोणताही आदर नाही.’’ काँग्रेसने राष्ट्रीय पक्ष म्हणून स्थान जवळपास गमावलेच आहे, आता नैतिकदृष्टया त्यांनी राजकीय पक्ष म्हणून अस्तित्वात उरण्याचाही अधिकार गमावला आहे.