पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज झारखंडमधील दुमका येथील जाहीर सभेत सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाच्या सरकारवर टीका केली. झारखंडमध्ये इतके सुंदर डोंगर आहेत, पण इथे फक्त नोटांच्या डोंगराची चर्चा होते. राज्यातील लोकांची फक्त लूट होत आहे, असा आरोप करत झामुमो आणि काँग्रेस फक्त मतपेटीचं राजकारण करत असल्याचा आरोप मोदींनी केला.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “मला एका माझ्या सहकाऱ्याने सांगितले की, लव जिहाद हा शब्द पहिल्यांदा झारखंडमध्ये वापरला गेला. तसेच आपल्या देशात रविवारी सर्वांना सुट्टी असते. जेव्हा आपल्या देशावर ब्रिटिशांचे राज्य होते, तेव्हा ख्रिश्चन समाज रविवारी सुट्टी घेत असे. ही परंपरा तेव्हापासून सुरू झाली. रविवार हा हिंदूंशी जोडलेला नाही, तर ख्रिश्चनांशी जोडलेला आहे. तब्बल २०० ते ३०० वर्षांपासून ही पद्धत सुरू आहे. मात्र यांनी (झारखंड सरकार) रविवारची सुट्टी काढून टाकली. तिथे शुक्रवारी सुट्टी असेल असे सांगितले. हिंदूंशी तर अडचण होतीच. आता तुमचा ख्रिश्चन समाजाशाही वाद आहे? हे काय चालू आहे?”
काँग्रेसचा पलटवार
पंतप्रधान मोदींनी झारखंडमध्ये रविवारच्या सुट्टीवरून विरोधकांना लक्ष्य केल्यानंतर आता काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी त्यांना उत्तर दिले आहे. आपल्या एक्स अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत पवन खेरा म्हणाले, “पंतप्रधान मोदींनी रविवारची सुट्टी ख्रिश्चनामुळे मिळाली, असे सांगितले. देशाचे पंतप्रधान जेव्हा तोंड उघडतात, तेव्हा ते काहीतरी अजब बोलतात. पूर्ण देश त्यांच्यावर हसत आहे. तुम्ही १० वर्षांपासून देशाचे पंतप्रधान आहात आणि तुम्ही प्रचारात रविवार, सोमवारची सुट्टी करत बसला आहात. १० वर्षात सत्ता असताना मग सुट्टी का बदलली नाही? देशात आणखी काही बदल करू शकला नाहीत, कमीतकमी सुट्टी तरी बदलायची होती.”
बेरोजगार तर रविवारीही बेरोजगारच असतो
पवन खेरा पुढे म्हणाले, “सुट्टी रविवारी असो किंवा सोमवारी. पण ज्याला रोजगारच नाही, तो रविवारीही बेरोजगार असतो आणि सोमवारीही. नोकरी नाही म्हणून अनेक तरूण आत्महत्या करत आहेत. ते आत्महत्या करताना रविवार, सोमवार पाहत नाहीत. पेट्रोल, गॅस सिलिंडर रविवारीही तितक्याच किमतीत मिळतो आणि इतर दिवशीही तेवढ्याच किमतीत मिळतो. तुमची प्राथमिकता महत्त्वाच्या विषयांना नव्हती, हे आम्ही १० वर्षांपासून सांगत होतोच. आता लोकांनाही कळले आहे, तुमची प्राथमिकता कशाला आहे? आता ४ जूननंतर तुम्हाला आराम करण्याची संधी मिळणार आहेच. चांगला आराम करा.”
© IE Online Media Services (P) Ltd