नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात सोमवारी दूरध्वनीवरून चर्चा झाली. यावेळी उभय राष्ट्रांतील विशेष व्यूहात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी उभयपक्षीय विविध भविष्यकालीन उपक्रमांसाठी एक कृती आराखडा तयार करण्याबाबत दोन्ही नेते सहमत झाले. यावेळी झालेल्या सौहार्दपूर्ण चर्चेत २०२४ मधील ‘ब्रिक्स’ परिषदेच्या रशियाच्या अध्यक्षपदासह विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> अयोध्येत आजपासून धार्मिक विधी; श्रीरामाच्या मूर्तीची १८ जानेवारीला गाभाऱ्यात स्थापना

मोदींनी या चर्चेची माहिती ‘एक्स’वरून देताना नमूद केले, की अध्यक्ष पुतिन यांच्याशी फलदायी चर्चा झाली. आम्ही आमच्या विशेष व्यूहात्मक भागीदारीतील विविध सकारात्मक बाबींवर चर्चा केली आणि भविष्यातील उपक्रमांसाठी एक आराखडा तयार करण्यास सहमती दर्शवली. भारत, ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या ‘ब्रिक्स’च्या रशियाच्या अध्यक्षपदासह विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर आम्ही सार्थ चर्चा केली. या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या एका निवेदनात परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे, की मोदी आणि पुतिन यांनी दोन्ही देशांमधील अलीकडे झालेल्या उच्चस्तरीय वाटाघाटींचा पाठपुरावा करताना द्विपक्षीय सहकार्याच्या अनेक मुद्द्यांबाबत प्रगतीचा आढावा घेतला. मोदींनी २०२४ मध्ये रशियाच्या ‘ब्रिक्स’च्या अध्यक्षपदासाठी पुतिन यांना शुभेच्छा दिल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi speaks to putin india support to russia for brics presidency zws