जगाच्या कल्याणासाठी अध्यात्मिक उर्जेने वाटचाल करणाऱ्या देशासोबत कालीमातेचा आशीर्वाद सदैव आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी म्हटले आहे. कोलकाता येथे रामकृष्ण मिशनने आयोजित केलेल्या स्वामी आत्मस्थानंद यांच्या शताब्दी सोहळ्याला ते संबोधित करत होते. काली या चित्रपटाच्या पोस्टरनंतर झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशावर कालीमातेची कृपा असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान मोदींचे हे विधान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशीही जोडले जात आहे कारण त्यांच्या पक्षाच्या टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांनी माता कालीबद्दल वादग्रस्त विधान केले होते. मोईत्रा यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून भाजपाने त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रविवारी स्वामी आत्मस्थानंदजींच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना, पंतप्रधान मोदींनी रामकृष्ण परमहंस यांचे स्मरण केले. “स्वामी रामकृष्ण परमहंस हे असेच एक संत होते ज्यांना कालीमातेचे कालीचे दर्शन झाले होते. त्यांनी आपले संपूर्ण अस्तित्व कालीमातेच्या चरणी अर्पण केले होते. ते म्हणत असत की हे सर्व जग, सर्व काही देवीच्या चैतन्याने व्यापलेले आहे. बंगालच्या काली पूजेत हे चैतन्य दिसून येते,” असे मोदी म्हणाले.

“जेव्हा जेव्हा मला संधी मिळाली तेव्हा मी बेलूर मठ आणि (दक्षिणेश्वर) काली मंदिराला भेट दिली. जेव्हा तुमची श्रद्धा शुद्ध असते, तेव्हा देवी स्वतः तुम्हाला मार्ग दाखवते. काली मातेचे अमर्याद आशीर्वाद सदैव भारतावर आहेत. देश जगाच्या कल्याणासाठी या आध्यात्मिक उर्जेने पुढे जात आहे,” असेही मोदींनी आपल्या भाषणादरम्यान म्हटले.

विश्लेषण : पश्चिम बंगालमधील कालीमातेच्या मंदिरांमध्ये मासे आणि मद्य अर्पण केले जाते का?

मानवतेच्या सेवेसाठी रामकृष्ण मिशनचे कौतुक करताना मोदी म्हणाले की, देशातील संत हे राष्ट्रीय एकात्मतेचे दूत म्हणून ओळखले जातात आणि परदेशात भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधी आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींनी बंगालच्या कालीपूजेचा आणि स्वामी विवेकानंदांचाही उल्लेख केला. पंतप्रधान म्हणाले की, “स्वामी विवेकानंद कतृत्वाने मोठ्या उंचीचे होते पण, कालीमातेच्या भक्तीत ते लहान मुलासारखे रमून जायचे. स्वामी आत्मस्थानंद यांचीही अशीच अतूट श्रद्धा होती.”

पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यानंतर भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी महुआ मोइत्रा यांच्यावर टीका केली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी काली माता ही केवळ बंगालचेच नाही तर संपूर्ण भारताचे भक्तीचे केंद्र असल्याबद्दल आदरपूर्वक बोलतात. दुसरीकडे तृणमूल खासदार त्यांचा अपमान करतात आणि ममता बॅनर्जी त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांचा बचाव करतात,” असे मालवीय यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून काली या माहितीपटाच्या पोस्टरवरून देशभरात वाद सुरू आहे. चित्रपट निर्मात्या असणाऱ्या लीना मणीमेकलाई यांच्या माहितीपटाचे पोस्टर हे हिंदुंच्या भावना दुखावणारं असल्याची टीका केली जात असून त्यावरून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. एकीकडे हा वाद सुरू असताना दुसरीकडे यासंदर्भात बोलताना तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी केलेल्या विधानावरुन नवा वाद सुरु झाला आहे. एका कार्यक्रमात बोलताना मोईत्रा यांनी विधान केले होते.

काय म्हणाल्या महुआ मोईत्रा?

यासंदर्भात बोलताना महुआ मोईत्रा यांनी प्रत्येकाला आपल्या इश्वराविषयी कल्पना करण्याचं स्वातंत्र्य आहे, असं म्हटलं आहे. “माझ्यासाठी कालीमाता मांसाहार आणि मद्याचा स्वीकार करणारी आहे. तुमच्या ईश्वराविषयी कल्पना करण्याची तुम्हाला स्वातंत्र्य आहे. काही ठिकाणी ईश्वराला व्हिस्की नैवेद्य म्हणून दिली जाते, तर काही ठिकाणी ही ईश्वरनिंदा ठरते”, असं महुआ मोईत्रा म्हणाल्या आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi statement on kali poster controversy said blessings of mother kali always with india abn