महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय मीठ सत्याग्रह स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर आहेत. दांडी येथील मुख्य उद्घाटन सोहळ्याआधी मोदींनी सुरत आणि दांडी येथे अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले. सुरत येथील नव्या टर्मिनस इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान मोदी भाषण देत असतानाच अचानक एका कॅमेरामनला चक्क आली. त्यावेळी मोदींने आपले भाषण थांबवले आणि त्या कॅमेरामनला मदत करण्याचे आदेश स्वयंसेवकांना दिले. हा सर्व प्रसंग तेथील कॅमेरांमध्ये कैद झाला आहे.

मुख्य मंचापासून काही अंतरावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसाठी एक छोटा मंच तयार करण्यात आला होता. मोदींचे भाषण सुरु असताना याच ठिकाणी वार्तांकनासाठी आलेल्या किसन रामोलीया या कॅमेरामनला चक्क आली आणि तो जागेवर पडला. त्यानंतर तेथे एकच गोंधळ उडाला. किसनला मदत करण्यासाठी तेथील काही स्वयंसेवक धावले. हा सगळा प्रकार पाहून मोदींनी आपले भाषण मध्येच थांबवले आणि माईक वरुनच रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्याचे आदेश दिले. आयोजकांनीही तातडीने किसनला मंडपाबाहेर घेऊन जात १०८ क्रमांकावरुन येणाऱ्या आप्तकालीन रुग्णवाहिकेच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. एका कॅमेरामनसाठी मोदींनी भाषण थांबवल्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ओदिसाच्या दौऱ्यावर असताना असाच प्रसंग घडला होता. भुवनेश्वर विमानतळाजवळ राहुल गांधींचा ताफा पोहचल्यानंतर तेथे वार्तांकनासाठी आलेल्या एका कॅमेरामनचा तोल गेला आणि तो पायऱ्यांवरुन खाली पडला. त्यावेळी राहुल यांनी तात्काळ धावत जाऊन त्या कॅमेरामनला मदत केली होती.

Story img Loader