पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज उत्तरप्रदेशातल्या, आपला मतदारसंघ असलेल्या वाराणसीला भेट दिली. यावेळी त्यांनी कालभैरव मंदिरात पूजाअर्चा केली त्यासोबतच पवित्र गंगा नदीत स्नानही केलं. वाराणसीच्या काशी विश्वनाथ कॉरीडॉरच्या उद्घाटनासाठी ते उपस्थित आहेत.
या पवित्र मानल्या जाणाऱ्या शहरातल्या काही स्थानिकांची भेट घेत मोदींनी त्यांच्या स्वागत-सत्काराचा लाभ घेतला. या भागातील रहिवाशांनी पंतप्रधान मोदींवर पुष्पवृष्टी केली. यावेळी हा संपूर्ण परिसर मोदी मोदी आणि हर हर महादेवच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता. त्यानंतर पंतप्रधानांनी खिरकिया घाट ते ललिता घाट हा बोट प्रवास करत काशी विश्वनाथ मंदिर भेटीसाठी प्रयाण केलं.
“मी भारावून गेलो आहे. आता काही वेळातच आपण काशी विश्वनाथ धाम प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याला प्रारंभ करणार आहोत. पण या आधी मी काल भैरवजींचं दर्शन घेतलेलं आहे”, अशा आशयाचं ट्वीटही मोदींनी केलं आहे. काशी विश्वनाथ कॉरीडॉर या प्रकल्पाच्या फेज १ चं उद्घाटन आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या प्रकल्पाची किंमत साधारण ३३९ कोटी इतकी आहे. हा प्रकल्प काशी विश्वनाथ मंदिर आणि गंगेचा वाराणसीमधला किनारी प्रदेश यांना जोडणारा आहे.
उत्तरप्रदेशातल्या विधानसभा निवडणुकांच्या अगदी काही महिने आधीच या प्रकल्पाचं उद्घाटन होत आहे. भारतीय जनता पार्टी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे या निमित्ताने पुन्हा एकदा सत्तेत येऊ पाहत आहे. आपल्या मतदारसंघाच्या दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे पंतप्रधान मोदींच्या सोबत असणार आहेत.