भारताकडे राफेल विमाने असती, तर देशाने बरीच मोठी कामगिरी केली असती, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमधील एका कार्यक्रमात केले. आज भारत एका सुरात बोलत असून, आपल्याकडे राफेल असते तर काय घडू शकले असते याची चर्चा करत आहे, असं मोदी म्हणाले. भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण स्थितीच्या पार्श्वभूमीवर राफेल विमानखरेदीचे मोदींनी समर्थन केले.
शनिवारी नवी दिल्लीमध्ये इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह 2019मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी राफेल सौद्यावरून विरोधकांकडून सातत्याने टीका होत असताना या व्यवहाराचे समर्थन करत मोदींनी त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. राफेल वादाचा उल्लेख करत ते म्हणाले, राफेलवरील स्वार्थी राजकारणापायी देशाचं मोठं नुकसान झालं आहे. राफेलची कमतरता आज देशाला जाणवते आहे.
अभिनंदन शब्दाचा अर्थ बदलेल –
विंग कमांडर अभिनंदन वर्तमान मायदेशी परतल्याच्या संदर्भाने दिल्लीतील विज्ञान भवनात एका कार्यक्रमात बोलताना , अभिनंदनचा अर्थ स्वागत होतो. पण, आता अभिनंदनचा अर्थच बदलून जाईल, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. येथे एका कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले की, भारतात ही ताकद आहे की, तो डिक्शनरीतील शब्दांचा अर्थ बदलून टाकतो.अभिनंदन याचा इंग्रजीतील अर्थ काँग्रॅच्युलेशन्स असा होतो. आता या शब्दाचा अर्थ बदलेल. हीच या देशाची ताकद आहे’, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.