पीटीआय, लंडन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे नवनिर्वाचित पंतप्रधान ऋषी सुनक यांचे दूरध्वनीवरून अभिनंदन केले. या वेळी दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ करण्यासोबत मुक्त व्यापार करारावरही चर्चा झाली. सुनक यांनी ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले.
‘मी नव्या भूमिकेत आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार मानतो. सुरक्षा, संरक्षण आणि आर्थिक क्षेत्रात सहकार्य अधिक वाढवून दोन्ही लोकशाही देश किती मोठी झेप घेऊ शकतात, याबाबत मी उत्साहित आहे,’ असे ट्वीट सुनक यांनी केले. तत्पूर्वी पंतप्रधान मोदींनी ट्विटरद्वारेही सुनक यांना शुभेच्छा दिल्या होत्या. ‘सर्वसमावेशक सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी आम्ही एकत्र काम करू. समतोल मुक्त व्यापार करार लवकरात लवकर अस्तित्वात यावा, यावरही आमचे एकमत झाले आहे,’ असे ट्वीट मोदींनी केले. सुनक हे ब्रिटनचे सर्वात तरुण आणि पहिले बिगर-श्वेतवर्णीय पंतप्रधान झाल्यानंतर आता सरकार स्थिर झाल्याचे चित्र आहे. तसेच बोरीस जॉन्सन सरकारमध्ये अर्थमंत्री असताना सुनक हे भारतासोबत मुक्त व्यापार कराराचे पाठीराखे होते. त्यामुळे भारतासोबत व्यापार करारावर अधिक वेगाने काम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
‘छोटय़ा घरात समाधानी’
ऋषी सुनक, त्यांच्या पत्नी अक्षता मूर्ती आणि दोन मुली हे कुटुंब १० डाऊनिंग स्ट्रीटमधील छोटय़ा घरामध्येच राहणार आहे. टोनी ब्लेअर यांच्या काळापासून ब्रिटनचे पंतप्रधान शेजारच्या ११ डाऊनिंग स्ट्रीटमधील (अर्थमंत्र्यांचे कार्यालय) ४ शयनगृहे असलेल्या घरात राहात होते. सुनक यांनी ही परंपरा मोडीत काढली. स्वत: अर्थमंत्री असताना १० क्रमांकाच्या घरात सुनक रहात होते. आम्ही या घराची सजावट केली असून आमच्या कुटुंबासाठी ते पुरेसे आहे, असे सुनक यांनी जाहीर केले.