कन्याकुमारी : द्रमुक हा पक्ष तमिळनाडूच्या भवितव्याचा शत्रू असून तो देश, संस्कृती आणि वारसा याचा तिरस्कार करतो असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे केला. येथे आयोजित भाजपच्या जाहीर सभेत पंतप्रधान बोलत होते.
पूर्वीच्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या राजवटीत, द्रमुक हा प्रमुख घटक होता, त्यांनी कन्याकुमारीच्या विकासासाठी फारसे काही केले नाही. २०१४ मध्ये रालोआ सरकार आल्यानंतर रस्ते क्षेत्रासह विकास कामे वेगाने मार्गी लावली गेली आहेत असा दावा मोदींनी केला.
‘द्रमुक आणि काँग्रेसचा लुटीचा इतिहास आहे. त्यांना जनतेला लुटण्यासाठी सत्तेत यायचे आहे. एका बाजूला भाजपच्या कल्याणकारी योजना आहेत, तर दुसरीकडे ऑप्टिकल फायबर, ५जी आणि इतर डिजिटल उपक्रम असे कोट्यवधी रुपयांचे घोटाळे आहेत. द्रमुक २ जी घोटाळ्याचा ‘सर्वात मोठा लाभार्थी’ होता, असा आरोप मोदी यांनी या वेळी केला.
हेही वाचा >>> सर्वोच्च न्यायालयाने भाजपची चौकशी करावी! निवडणूक रोख्यांच्या मुद्द्यावरून काँग्रेसची मागणी
द्रमुकने या वर्षी जानेवारीमध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा प्रसारित करण्यावर बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता असा आरोप मोदींनी केला. आपला देश, त्याची संस्कृती, वारसा आणि महापुरुषांबद्दल त्यांच्या मनात किती द्वेष आहे याची कल्पना करा, असे ते म्हणाले. जनतेने लोकांनी ‘द्रमुक’चा अहंकार मोडून काढावा असे आवाहन त्यांनी केले.
‘केरळमध्ये कमळ फुलेल’
पथनमतिट्टा (केरळ) : केरळच्या दक्षिणेकडील पथनमतिट्टा जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ख्रिास्ती समाजाशी संवाद साधला. येथे जाहीर सभेस संबोधित करताना मोदी म्हणाले की, २०१९ च्या गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपची मतांची टक्केवारी दुहेरी अंकात होती आणि त्यामुळे केरळमध्ये दुप्पट जागांवर यश मिळवून कमळ फुलवण्याचे लक्ष्य अशक्य नाही.