तिरुवअनंतपुरम, तिरुप्पुर : ‘इंडिया’ आघाडीने २०२४च्या लोकसभा निवडणुकीतील पराभव मान्य केला आहे, त्यामुळे ते सतत माझी निंदा करत असतात अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली. पंतप्रधान मोदी यांनी केरळ आणि तमिळनाडूचा दौरा केला. दोन्ही राज्यांमध्ये त्यांनी भाजपच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.
काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष केरळमध्ये एकमेकांचे शत्रू आहेत, पण राज्याबाहेर मात्र ते एकमेकांचे पक्के मित्र आहेत असा हल्लाबोल त्यांनी तिरुवअनंतपुरम येथे बोलताना केला. इंडिया आघाडीचे घटक असलेले हे दोन्ही पक्ष केरळमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. केरळ भाजप शाखेने आयोजित केलेल्या पदयात्रेचा समारोप येथील सेंट्रल स्टेडियममध्ये करण्यात आला.
हेही वाचा >>> गगनयाना’तून अवकाशातील भरारीपूर्वी पृथ्वीवर कसून तयारी
पंतप्रधान मोदी म्हणाले की, विरोधी पक्षांकडे देशाच्या विकासाचा कोणता आराखडा नाही आणि त्यामुळे आपण आगामी लोकसभा निवडणूक जिंकणार नाही याची त्यांना खात्री पटली आहे. त्यामुळेच ते आपल्याला शिवीगाळ करत असतात असा दावा मोदी यांनी केला. केरळमधील काँग्रेस पक्षाने डाव्या आघाडीचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यावर भ्रष्टाचाराचा आणि घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केल्याची आठवण मोदींनी करून दिली. त्यानंतर डाव्या आघाडीच्या सरकारच्या पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीमार केला असे ते पुढे म्हणाले. भाजप मात्र मतपेढीच्या नजरेतून केरळकडे पाहत नाही अशी ग्वाहीही त्यांनी दिली. तमिळनाडूमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष के अण्णामलाई यांनी आयोजित केलेल्या राज्यव्यापी यात्रेचा समारोप तिरुप्पुर येथे झाला. यावेळी ‘सबका साथ सबका विकास’ ही घोषणा देत केलेल्या भाषणामध्ये पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. इंडिया आघाडीला पराभवाची खात्री पटलेली आहे, त्यामुळे ते राज्याला लुटत आहेत असा आरोप त्यांनी केला. ‘यूपीए’च्या काळात तमिळनाडूला जितका निधी मिळाला होता, त्याच्यापेक्षा जास्त निधी गेल्या १० वर्षांमध्ये आम्ही दिला आहे असा दावा त्यांनी केला.