नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी ११ राज्यांच्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या नऊ वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेगाडय़ांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. राजस्थान, तमिळनाडू, तेलंगण, आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, ओदिशा, झारखंड आणि गुजरातमधील स्थळांचा यात समावेश आहे.
हेही वाचा >>> एक निवडणूक संकल्पनेबाबत पक्ष, विधि आयोगाला आमंत्रण; उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत निर्णय
यासंदर्भातील निवेदनात नमूद केले आहे, की पंतप्रधान दूरदृश्यप्रणालीद्वारे या रेल्वेगाडय़ांना हिरवा झेंडा दाखवतील. या वंदे भारत एक्स्प्रेस उदयपूर-जयपूर, तिरुनेलवेली-मदुराई-चेन्नई, हैदराबाद-बंगळुरू, विजयवाडा-चेन्नई, पाटणा-हावडा, कासारगोड-तिरुवनंतपुरम, राउरकेला-भुवनेश्वर-पुरी, रांची-हावडा, आणि जामनगर-अहमदाबाददरम्यान धावतील. देशभरातील रेल्वे दळणवळण व्यवस्थेत सुधारणा आणि रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने या गाडय़ा एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यात म्हटले आहे.
वेळेची मोठी बचत
’राउरकेला-भुवनेश्वर-पुरी आणि कासारगोड-तिरुवनंतपुरम मार्गावरील सध्याची सर्वात वेगवान रेल्वेगाडीच्या तुलनेत वंदे भारत एक्सप्रेस संबंधित गंतव्य स्थानांतील प्रवासाचा वेळ सुमारे तीन तासांनी कमी करेल.
हेही वाचा >>> महिला आरक्षण विधेयक : मोदींना लोकसभेत ओबीसी-मुस्लीम महिला नको आहेत का? मुस्लीम खासदाराचा प्रश्न
’हैदराबाद-बंगळुरू मार्गावर अडीच तासांपेक्षा जास्त, तर तिरुनेलवेली-मदुराई-चेन्नई मार्गावरील प्रवासात दोन तासांपेक्षा जास्त वेळेची बचत होईल.
’रांची-हावडा, पाटणा-हावडा आणि जामनगर-अहमदाबाद दरम्यानचा प्रवासाचा वेळ सध्या उपलब्ध असलेल्या सर्वात वेगवान रेल्वेगाडीच्या तुलनेत सुमारे एक तासाने कमी होईल. ’उदयपूर-जयपूरदरम्यान या रेल्वेप्रवासात अर्धा तास कमी लागेल.