Surat Diamond Bourse Inaguaration : गुजरातमध्ये नव्याने विकसित झालेले सूरत डायमंड बोर्सचे उद्घाटन आज (१७ डिसेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सूरत डायमंड बोर्स हे जगातील सर्वांत मोठे कार्यालय ठरणार आहे. “सूरत डायमंड बाजार हे आंतरराष्ट्रीय हिरे आणि दागिन्यांच्या व्यवसायासाठी जगातील सर्वात मोठे आणि आधुनिक केंद्र असेल”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हे रफ आणि पॉलिश्ड हिरे तसेच दागिन्यांच्या व्यापारासाठी जागतिक केंद्र असेल.यामध्ये अत्याधुनिक आयात आणि निर्यातीसाठी ‘कस्टम क्लीयरन्स हाऊस’, किरकोळ दागिन्यांच्या व्यवसायासाठी ज्वेलरी मॉल आणि आंतरराष्ट्रीय बँकिंग आणि सुरक्षित व्हॉल्टसाठी सुविधा देण्यात आल्या आहेत.
शनिवारी पीएम मोदींनी X वर एका पोस्टमध्ये उद्घाटन समारंभाची माहिती देखील शेअर केली. ते म्हणाले, “सुरतमध्ये, सूरत डायमंड बाजाराचे उद्घाटन होणार आहे. हिरे उद्योगाला यामुळे मोठी चालना मिळणार आहे. ‘कस्टम क्लीयरन्स हाऊस’, ज्वेलरी मॉल आणि इंटरनॅशनल बँकिंग आणि सेफ व्हॉल्ट्सची सुविधा हे बॉर्सचे महत्त्वपूर्ण भाग असतील.
जगातील सर्वांत मोठे कार्यालय
अंदाजे साडेतीन हजार कोटी रुपये खर्चून बांधलेली ही इमारत ६७ लाख स्क्वेअर फूट फ्लोअर स्पेसमध्ये पसरलेली आहे आणि जवळपास साडेचार हजार डायमंड ट्रेडिंग कार्यालये ठेवण्याची क्षमता आहे. या वर्षी ऑगस्टमध्ये, डायमंड रिसर्च अँड मर्कंटाइल (DREAM) सिटीचा भाग असलेल्या या इमारतीला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने जगातील सर्वात मोठी कार्यालयीन इमारत म्हणून मान्यता दिली.
हेही वाचा >> मुंबईतला हिरे व्यापार सूरतमध्ये जाणार? कसे आहे सूरतमधील जगातील सर्वात मोठे कार्यालय?
सूरत हिरे सराफा बाजार संकुलाच्या सर्वसाधारण समितीचे सदस्य दिनेश नवादिया यांनी याआधी दिलेल्या माहितीनुसार, संकुलातील ४,२०० कार्यालय विकले गेले आहेत. एसडीबीमुळे किमान एक लाख लोकांना थेट रोजगार मिळणार आहे.
३५.५४ एकर जागेवर बांधलेल्या या मेगास्ट्रक्चरमध्ये नऊ ग्राउंड टॉवर्स अधिक १५ मजले आहेत. ऑफिस स्पेस ३०० स्क्वेअर फूट ते १ लाख स्क्वेअर फूटपर्यंत आहेत. नऊ आयताकृती टॉवर एकमेकांना जोडलेले आहेत. या इमारतीला इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (IGBC) कडून प्लॅटिनम मानांकन आहे.
सूरत हिरे सराफा बाजार कसा आहे?
सध्या सूरत आणि मुंबई या ठिकाणांहून हिरे बाजार सक्रिय आहे. पूर्वी मुंबई हे हिरे बाजाराचे मुख्य केंद्र होते. सूरत हिरे सराफा बाजार अर्थात Surat Diamond Bourse (SDB) या ठिकाणी हिऱ्यांवरील कटिंग, पॉलिशिंग, व्यापार, संशोधन यासारख्या प्रक्रिया एकाच जागी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ज्यामुळे मुंबईतील हिरे उद्योग सूरतमध्ये स्थलांतरित होईल असे सांगितले जाते.
हेही वाचा >> मोठी बातमी! १७ हजार कोटींचा हिरे व्यापार सूरतला हलवत गुजराती व्यापाऱ्यांचा मुंबईला मोठा धक्का
सध्या सूरतमधील महिधरर्परा हिरा बाजार आणि वराछा हिरा बाजार या दोन ठिकाणी हिरे व्यापार केला जातो. मात्र, या ठिकाणी सुरक्षेची हमी नाही. रस्त्यालगत असलेल्या दुकानांत व्यापारी तिथेच उभे राहून व्यापार करतात. हिऱ्यांवरील प्रक्रिया करण्याचा मुख्य उद्योग सध्या मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल (Bandra Kurla Complex – BKC) येथे आहे. बीकेसीमध्ये हिरे व्यापारासाठी आणि आंतरराष्ट्रीय खरेदीदारांसाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत. हिरे उद्योगाशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, मुंबईमध्ये सध्या जागेची मोठी कमतरता भासत आहे. तसेच रिअल इस्टेटचे भाडेही महागले आहे. त्याशिवाय मुंबईत व्यापार होणाऱ्या हिऱ्यांचा मोठा भाग सूरतमध्ये उत्पादित केला जातो. तिथून स्थानिग अंगडिया ट्रेनमधून हिरे घेऊन मुंबईत येतात. या प्रवासासाठी किमान साडे चार तासांचा वेळ जातो.