लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यासाठी १ जून रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वी ३० मे रोजी मतदानपूर्व आचारसंहिता घोषित होईल. आचारसंहितेची घोषणा होताच पंतप्रधान मोदी ३० मे ते १ जूनपर्यंत कन्याकुमारीला भेट देऊन ध्यानधारणा करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्याकुमारीच्या समुद्रकिनारी असलेल्या विवेकानंद रॉक मेमोरियलला भेट देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी याठिकाणी दोन दिवस ध्यानधारणा करणार आहेत. याच ठिकाणी स्वामी विवेकानंद यांनीही ध्यानधारणा केली होती. .

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कसा असेल पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम?

लोकसभेच्या सातव्या टप्प्यासाठी १ जून रोजी ५७ लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. ३० मे रोजी सायंकाळी ५ वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. ३० मे रोजीच पंतप्रधान मोदींची पंजाबमध्ये जाहीर सभा होत आहे. ही सभा झाल्यानंतर ते तमिळनाडूच्या दौऱ्यावर रवाना होतील. तिथून ते ३१ मे रोजी विवेकानंद रॉक मेमोरियलला भेट देऊन दोन दिवस ध्यानधारणा करतील, असे सांगितले जात आहे. या दौऱ्याचा अद्याप अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला नाही.

कन्याकुमारीची निवड का?

कन्याकुमारीच्या रॉक मेमोरियल येथे ध्यान केल्यानंतर स्वामी विवेकानंद यांनी भारतासाठीचे आपले विचार व्यक्त केले होते. या जागेचा स्वामी विवेकानंद यांच्यावर फार प्रभाव पडला होता. ज्याप्रकारे सारनाथी भूमी गौतम बुद्धांच्या जीवनातील महत्त्वाचा दुवा मानली जाते, त्याचप्रकारे कन्याकुमारीतील टेकड्यांचे विवेकानंद यांच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे सांगितले जाते. देशभरात प्रवास केल्यानंतर स्वामी विवेकानंद याठिकाणी आले होते, त्यांनी तीन दिवस याठिकाणी ध्यान केले होते.

भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, विवेकानंद यांनी ज्याठिकाणी ध्यान केले, त्याच ठिकाणी ध्यान करत पंतप्रधान मोदी विवेकानंद यांच्या विकसित भारताची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत. कन्याकुमारी हे दक्षिण भारताचे टोक मानले जाते. याठिकाणी पूर्व आणि पश्चिमी किनारा एकत्र येतो. हिंदी महासागर, बंगालची खाडी आणि अरबी समुद्राचा संगम याठिकाणी पाहायला मिळतो.

२०१९ साली केदारनाथ गुहेत केले होते ध्यान

२०१९ सालीही निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ध्यानधारणा केली होती. लोकसभेच्या शेवटच्या टप्प्याचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान मोदी उत्तराखंडमधील केदारनाथ येथे गेले होते. तेथील रुद्र गुहेत त्यांनी ध्यानधारणा केली होती. यावेळी ते कन्याकुमारी येथे जात आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi to meditate at kanyakumari for two days on culmination of campaign kvg