लोकप्रिय जागतिक नेत्यांच्या यादीत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिलं स्थान पटकावलं आहे. सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींनी पहिला क्रमांक मिळवला आहे. अमेरिकेतील डेटा इंटेलिजन्स कंपनी ‘मॉर्निग कन्सल्ट’च्या सर्व्हेक्षणानुसार, ७५ टक्के रेटिंगसह नरेंद्र मोदी अग्रस्थानी राहिले आहेत. नरेंद्र मोदी यांच्यानंतर अनुक्रमे मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष मॅन्यूअल लोपेज ओब्राडोर आणि इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी यांचा क्रमांक आहे. ओब्राडोर यांना ६३ टक्के रेटिंग असून, मारियो यांची रेटिंग ५४ टक्के आहेत. या यादीत जगभरातील एकूण २२ नेते आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना यादीमध्ये ४१ टक्के रेटिंगसह पाचवं स्थान मिळालं आहे. बायडन यांच्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांना ३९ टक्के रेटिंग आहे. तर सातव्या क्रमांकावर ३८ टक्के रेटिंगसह जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आहेत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत पंतप्रधान मोदींच्या ‘लोकप्रियतेत’ घट; तरीही जागतिक नेत्यांमध्ये अजूनही अव्वल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधीही नोव्हेंबर २०२१ आणि जानेवारी २०२२ मध्ये यादीत पहिलं स्थान मिळवलं होतं.
मॉर्निंग कन्सल्ट हा ऑनलाइन प्लॅटफॉर्म असून, निवडणूक, राजकारणी आणि सध्याच्या विषयांवर रिअल-टाइम डेटा पुरवतं. मॉर्निंग कन्सल्ट दर आठवड्याला हा डेटा जारी करतं. ते दररोज सुमारे २०,००० ऑनलाइन मुलाखती घेतात.
वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, हे अप्रूव्हल रेटिंग १७ ते २३ ऑगस्ट मधील डेटाच्या आधारे काढण्यात आलं आहे. प्रत्येक देशात सर्व्हेमध्ये सहभागी लोकांची संख्या वेगळी आहे. या सर्व्हेत ज्येष्ठ नागरिकांना सहभागी करुन घेतलं जातं. सर्व मुलाखती ऑनलाइन पद्धतीने घेतले जात असून, भारतामधील सर्व्हेत सुशिक्षित लोकांचा समावेश आहे.