PM Modi US Visit Details : पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ ते १३ फेब्रुवारी दरम्यान अमेरिकेला भेट देणार आहेत, अशी घोषणा परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी शुक्रवारी केली. अमेरिकेत नुकत्याच झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी दमदार विजय मिळवत राष्ट्राध्यक्षपदी पुनरागमन केले आहे. दरम्यान ट्रम्प यांनी अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून २० जानेवारी रोजी शपथ घेतली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच अमेरिका दौऱ्यावर जात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला जाण्यापूर्वी १० ते १२ फेब्रुवारी दरम्यान फ्रान्सचा दौरा करणार आहेत. तिथे ते पॅरिसमध्ये होणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस अ‍ॅक्शन समिटचे सह-अध्यक्षपद भूषवणार आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ फ्रेब्रुवारीला फ्रान्सहून अमेरिकेला जाणार असल्यामुळे १३ फेब्रुवारीला त्यांची राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होण्याची शक्यता आहे.

आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विक्रम मिस्त्री म्हणाले की, “डोनाल्ड ट्रम्प यांच्या निमंत्रणावरून होत असलेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा अमेरिका दौरा दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांना अधिक चालना आणि दिशा देईल. ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर अमेरिकेला भेट देणाऱ्या पहिल्या काही जागतिक नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश असेल.”

अमेरिकन उद्योगपतींशी भेट

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विक्रम मिस्त्री यांनी पुढे सांगितले की, “पंतप्रधान मोदी त्यांच्या दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यात अनेक उद्योगपतींशी भेट घेणार असून, वरिष्ठ अमेरिकन अधिकारी देखील पंतप्रधानांना भेटण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर या अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान मोदी भारतीय नागरिकांशीही संवाद साधणार आहेत.” दरम्यान पंतप्रधान मोदी त्यांच्या भेटीदरम्यान टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांचीही भेट घेण्याची अपेक्षा आहे.

हद्दपारीच्या कारवाईवर चर्चा होण्याची शक्यता

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीयांना मायदेशी परत पाठवण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे. बुधवारी, अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या १०४ भारतीय नागरिकांना घेऊन अमेरिकेचे लष्करी विमान अमृतसरमधील श्री गुरु रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले होते. या स्थलांतरितांपैकी ३० जण पंजाबचे, हरियाणा आणि गुजरातचे प्रत्येकी ३३ जण, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचे प्रत्येकी तीन जण आहेत, तर दोन जण चंदीगडचे आहेत. यामध्ये १९ महिला आणि १३ अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. या मुद्द्यावरही पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.